Monsoon Update: मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यात पाच दिवस पावसाचा जोर, अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट
मान्सूनबाबत (Monsoon) महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस (rain) पुन्हा एकदा राज्याच्या विविध भागांमध्ये सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : मान्सूनबाबत (Monsoon) महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस (rain) पुन्हा एकदा राज्याच्या विविध भागांमध्ये सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. जून महिन्यात काही भागात पाऊस पडला तर काही भागात पाऊस पडला नाही, त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र त्यानंतर जुलैमध्ये सर्वदूर पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टी झाली. या पवासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला नद्यांना आलेले पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात गेली. तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यातील 116 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 231 पाळीव प्राणी दगावले आहेत. तसेच या पावसामुळे राज्यातील 2 हजार 86 घरांचे नुकसान झाले आहे.
मुंबईत शनिवारी पाऊस
राज्याच्या इतर भागांप्रमाणेच शनिवारी मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. मुंबईमध्ये रिमझिम पाऊस झाला तर उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. दरम्यान राज्यात पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय राहणार असून, त्याचे प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे. पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



एनडीआरएफची पथके तैनात
एक जूनपासून ते आतापर्यंत राज्याच्या 28 जिल्ह्यातील 314 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत असून, राज्याच्या विविध भागांमध्ये एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस सक्रिय राहणार असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नदी काठच्या गावांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.