काही न करताही आपल्या राज्यात विनयभंग होतोय, राज्यात कायदा कोणता?; ठाकरे गटाचा सवाल….
शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात जर घोषणाबाजी होणारच, गद्दारांच्या विरोधात घोषणाबाजी होणार नाही तर काय त्यांचे स्वागत होणार का..?
मुंबईः शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात अकोल्यात ठाकरे गटाच्या नितीन देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावरुन खासदार भावना गवळी यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी काल सांगितले होते. या प्रकरणावरून आता राजकारण तापले आहे. या प्रकरणावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी कायद्याचं राज्य राहिले नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याचबरोबर सध्या काही न करताच विनयभंग होतो आहे. त्यामुळे राज्यात कोणता कायदा चाललाय असा सवाल त्यांनी राज्यसरकारला केला आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी भावना गवळी यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सध्या राज्यात काहीही न करता विनयभंग होतो आहे.
त्यामुळे कायद्याचाच विनयभंग होतो आहे असा टोला त्यांनी शिंदे-ठाकरे गटाला लगावला आहे. कोणावरही खोटे गुन्हे नोंदवले जात असल्याचे सांगत त्यांनी भावना गवळी यांच्यावरही निशाणा साधला आहे. ठाकरे गटाने काहीच न करता त्यांच्यावर गु्न्हे नोंद केले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र शिंदे गटाचे आमदार खासदार कायदा हातात घेऊन काही ही वक्तव्य केली जातात ते कसे काय शिंदे सरकारला चालते असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
शिंदे गटाकडून हात पाय तोडण्याची भाषा केली जाते, तर दुसरीकडे पोलीस स्टेशनच्याच परिसरात गोळीबार केला जातो त्यामुळे राज्यात कायदा आहे का असंही त्यांनी म्हटले आहे.
खासदार भावना गवळी यांना रेल्वे स्थानकावर पाहिल्यानंतर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली आहे. गद्दारांनी बघून विरोधात घोषणाबाजी होणारच आहे त्याचे काय स्वागत करायचे का असा सवाल त्यांनी भावना गवळी यांना केला आहे. त्यामुळे भावना गवळी प्रकरणावरुन शिंदे-ठाकरे गट पुन्हा जुंपणार असल्याचे दिसून येत आहे.