कुठे होते एकनाथ शिंदे? तर मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे…; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्लाबोल
Uddhav Thackeray on Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र बंदवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी महाराष्ट्राल बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे काय म्हणाले? बदलापूर घटनेवर ठाकरेंचा प्रतिक्रिया, वाचा सविस्तर...
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये 3 ते 4 वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला. शाळेतील सफाईकामगाराने या मुलींवर लैंगित अत्याचार केल्याचं समोर आलं. त्यानंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली. बदलापूरमधील नागरिकांनी उतरत आंदोलन केलं. बदलापूर स्टेशनवर लोक एकत्र आले. त्यांनी रेलरोको केला. 11 तास हे आंदोलन चाललं होतं. या घटनेबाबत राज्यभरात चर्चा झाली. त्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याचसंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मला वाटतं मुळात ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी राबवलेली योजना नव्हती. मुळात त्यांचंच घर आहे ते.ठाणे जिल्ह्यातच बदलापूर आहे. त्यांना ही घटना घडली मान्य आहे का. असं घडलं तरी चालेल का? काल मुख्यमंत्री कुठे होते. राज्यभर निषेध होत होता. मुख्यमंत्री रत्नागिरीत लाडक्या बहिणींकडून राखी बांधत होते. अहो तुम्ही तुमच्या हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा. किती निर्लज्ज व्हायचं…., असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेंचा ‘घटनाबाह्य’ मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत. त्यांच्या अकलेच्या दिवाळखोरपणाबद्दल मी बोलणार नाही. परंतु, ज्या प्रमाणे निवडणूक डोळयासमोर ठेवून जनतेचा पैसा जनतेला देण्यासाठी योजना आणली. तशी ही योजना नव्हती. हे दुष्कृत्य आहे. त्यात राजकारण आणलं जात आहे असं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत मानसिकतेचे आहेत. ज्यांना ज्यांना दुष्कृत्या मागे आणि निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतं ते सर्व विकृत आहेत. ते सर्व या नराधमांचे पाठिराखे आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र बंद हा राजकीय नव्हे- ठाकरे
महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही. मला कोरोनाचे दिवस आठवले. महाराष्ट्र कुटुंब बनून कोरोनाच्या विरुद्ध लढला. तशीच ही वेळ आली आहे. विकृतीचा निषेध नाही तर बंदोबस्त करण्यासाठी राज्यातील माता भगिनींना आवाहन करतोय. प्रत्येकाला खंत आहे की आपण कसे जगत आहोत. मुलंबाळं शाळेत जात आहेत. त्या शाळेतही मुली जर का सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ काय राहणार? त्यासाठी राज्याने व्यक्त होण्याची गरज आहे. राजकारण म्हणून नाही तर माता भगिनीं सुरक्षित राहिली पाहिजे. याचा भान सर्वांना हवं. त्यानंतर राजकारण येतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.