लालपरीची समृद्धी वारी लयभारी ! नागपूर ते शिर्डी सवा चार तासांची बचत
रविवार दि. 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात जास्त लांबीच्या (701 कि.मी. ) समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुंबई : नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने उद्यापासून नव्या समृद्धीमार्गावरून नागपूर ते शिर्डी बस सेवा सुरू केली आहे. या मार्गाने स्लिपर (Sleeper) कम आसनी ( push-back ) बसद्वारे नागपूर ते शिर्डी या अंतरात सवा चार तासांची बचत होणार आहे.
एसटी प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी महामंडळाने उद्यापासून ( दि.15 डिसेंबर ) नव्या समृद्धीमार्गावरून नागपूर ते शिर्डी शयनयान कम आसनी बससेवा सुरू केली आहे. या बसमध्ये प्रवाशांना 2X1 पध्दतीची 30 आसने ( पुशबॅक पध्दतीची ) बसण्यासाठी उपलब्ध असून 15 शयन आसने (Sleeper) असल्याने प्रवाशांचा प्रवास अत्यंत आरामदायी होणार आहे.
या बसेस नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून रोज रात्री 09.00 वाजता सुटतील व पहाटे 05.30 वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचतील. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 कि.मी.आणि वेळेमध्ये 4.15 तासांची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति रु.1300/- आणि मुलांसाठी रू.670/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना 100 % मोफत तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50 % सवलत असणार आहे.
नागपूर ते औरंगाबाद ( मार्गे जालना ) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. यासाठी नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10.00 वाजता बसेस सुटतील आणि जालना मार्गे पहाटे 05.30 वाजता पोहोचतील.
या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.9 कि.मी. व प्रवास वेळेमध्ये 4.40 तासांची बचत होणार आहे. या बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु. 1100/- मुलांसाठी रु.575 /- इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु.945 /- आणि मुलांसाठी रु.505 /- इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.