मुलुंड हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची अपडेट, आरोपीने दोनदा केले दारुचे सेवन आणि त्यानंतर…
मुलुंडमध्ये मद्यधुंद अवस्थेत ऑडी चालविणाऱ्या चालकाने दोन रिक्षांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत.
Mulund Hit & Run Case Update : पुणे, नागपूर या पाठोपाठ मुंबईतील हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वरळीत एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुलुंडमध्ये मद्यधुंद अवस्थेत ऑडी चालविणाऱ्या चालकाने दोन रिक्षांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. आता याप्रकरणी ऑडीचालक विजय गोरे (43) याला कांजूरमार्गमधून अटक करण्यात आली आहे.
मुलुंड हिट अँड रनप्रकरणी आता एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मुलुंड हिट अँड रन प्रकरणी ऑडीचालक विजय गोरे या आरोपीने दारुच्या नशेत गाडी चालवल्याचे समोर आले आहे. आरोपी विजय गोरेने अपघातापूर्वी भांडुपमध्ये दारुची पार्टी केल्याचे समोर आलं आहे. भांडुपमध्ये रात्री उशिरा दारु प्यायलानंतर आरोपी ठाण्यात गेला होता. तिथे गेल्यानंतरही त्याने दारुचे सेवन केले. यानंतर पहाटेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत ऑडी चालवत त्याने दोन रिक्षांना धडक दिली.
बारमध्ये केली पार्टी
मिळालेल्या माहितीनुसार, विजय गोरे हा भांडुपमध्ये आधी मित्रांसोबत एक बारमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. विजय गोरेने त्या बारमध्ये पार्टी केल्यानंतर तो ठाण्यात गेला. तिथेही तो दारु प्यायला. यानंतर पहाटे तो त्याच्या ऑडी कारमधून ठाण्यातून भांडुपला परतत असताना त्याने मुलुंडला दोन रिक्षांना धडक दिली. सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास मुलुंडमधील डम्पिंग रोडवरून भरधाव वेगाने जात असताना हा अपघात झाला. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वेगात असलेल्या ऑडीने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की अपघातग्रस्त रिक्षा अन्य रिक्षावर आपटली. यावेळी दोन्ही रिक्षांचे चालक आणि दोन प्रवासी दुर्घटनेत जखमी झाले.
बहिणीच्या घरी जाऊन लपला
या घटनेनंतर ऑडीचालक विजय गोरेने घटनास्थळावरून पळ काढला. गोरेविरोधात मुलुंड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २८१, १२५ (अ) (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याचा कसून शोध सुरु होता. यानंतर तो बहिणीच्या घरी जाऊन लपला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि अटक केली.
विजय गोरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
विजय गोरे हा कांजूरमार्गमध्येही एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहतो. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. विजय गोरेला पोलिसांनी काही तासातच अटक केल्याने तो नशेत असल्याचे समोर आले आहे. पोलिस चौकशीदरम्यान विजयने कर्जतहून परतत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले आहे. मात्र पोलिसांना त्याच्या भांडुपच्या बारचे बिल हाती लागले आहे. त्यामुळे विजय गोरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.