मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आजपासून मध्य रेल्वे मार्गावरील लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांनी फर्स्ट क्लासचा पास काढला आहे, अशा प्रवाशांना आता एसी लोकलनेही (AC Local) प्रवास करता येऊ शकणार आहे. पण त्यासाठी त्यांना एक महत्त्वाचं काम करावं लागेल. त्यानंतरच मध्य रेल्वे मार्गावरील फर्स्ट क्लासचा पास असलेल्या प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता येऊ शकेल.
आपला फर्स्ट क्लासचा पास (First class pass) या प्रवाशांना अपग्रेड करावा लागणार आहे. हा पास अपग्रेड करताना प्रवाशांना फर्स्ट क्लासचा पास आणि एसी लोकलचा पास यातील दरात असलेली रक्कम भरावी लागेल आणि त्यानंतर त्याचा पास अपग्रेड करुन दिला जाईल. यानंतर प्रवाशांना एसी लोकलनेही प्रवास करता येणं शक्य होणार आहे.
आजपासून मध्य रेल्वे लोकल मार्गावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येते आहे. त्यामुळे आता तरी मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची नाराजी दूर होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या एसी लोकलमुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.
गेले अनेक दिवस एसी लोकलने प्रवास करायची मुभा मिळावी, अशी मागणीही फर्स्ट क्लास पास धारकांच्या वतीने केली जात होती. मध्य रेल्वेनं घेतलेल्या निर्णयामुळे एसी लोकलच्या प्रवाशांची संख्याही वाढेल. शिवाय गर्दीच्या वेळी प्रवाशांना होणारा मनस्तापही कमी होईल, असा विश्वास आता व्यक्त केला जातोय.
माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मध्य रेल्वे प्रशासनानं सुरु केलेल्या एसी लोकलच्या वाढीव फेऱ्यांवरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. महिन्याभरापूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनीही एसी लोकलला विरोध करत तीव्र निदर्शनं केली होती. त्यानंतरही अनेक दिवस एसी लोकलबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता.
फर्स्ट क्लासचा पास आणि एसी लोकलचा पास यांच्यातील किंमतीत तफावत जास्त होती. त्यामुळे लोकांनी एसी लोकलचा पास काढण्याला पसंती दिली नव्हती. दरम्यान, रोज रोज एसी लोकलचं तिकीट काढून प्रवास करणं शक्य नसल्याचंही प्रवाशांचं म्हणणं होतं.
महिन्याभरापूर्वी मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ऐन गर्दीच्या वेळी येणाऱ्या एसी लोकलमुळे प्रवाशांचा खोळंबा होत होता. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
याच वर्षाच्या सुरुवातीला एसी लोकलचे तिकीटदर हे 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले होते. पण एसी लोकलच्या पासचे दर हे इतर पासच्या तुलनेत महागच असल्यानं एसी लोकलचा प्रवास परवडणारा नाही, असा सूर उमटत होता. त्यामुळे अनेकांनी नियमित पास काढणंच पसंत केलं होतं.
अखेर आता फर्स्ट क्लासचा पास अपग्रेड करुन एसी लोकलने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना देण्यात आलीय. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलचा गारेगार प्रवास नोकरदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी पुरेसा ठरतो का, हे पाहणंही महत्त्वाचंय. अर्थात हे अपग्रेडेशन करण्यासाठी अतिरीक्त रक्कमही प्रवाशांना भरावी लागणार आहे. त्यामुळे याला कसा प्रतिसाद दिला मिळतो, हेही लवकरच स्पष्ट होईल.