Ajit Pawar : चंद्रकांत पाटील बोलले ते खरं, त्यांना माझं अनुमोदन; अजित पवारांचा टोला, शरद पवार एकटे राष्ट्रवादी चालवत असल्याचं केलं होतं वक्तव्य
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका, ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. ते मुंबईत बोलत होते.
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) एकटे राष्ट्रवादी चालवतात, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला माझे अनुमोदन आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला आहे. ते मुंबईतील जनता दरबारात बोलत होते. शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले ते म्हणाले, की बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना बाळासाहेब ठाकरे चालवत होते. तर भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून भाजपाच्या बोलणार्या लोकांना संधी मिळाली आणि आम्हाला आमच्या साहेबांमुळे संधी मिळाली. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लोकांचा करिष्मा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलले ते खरे आहे. त्यांच्या बोलण्याला माझे अनुमोदन आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतले ठळक मुद्दे
‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका’
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका, ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. सध्या गळीत हंगाम वाढला आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस आहे. यावर साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत. बीड जिल्ह्यात दु:खद घटना घडली आहे. आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, यावर बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सरकारच्यावतीने विश्वास दिला.
‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन’
सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो सरकारला मान्य करावा लागतो. राजद्रोह कलमाचा वापर करू नका, असे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितले आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन केंद्र सरकार करणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘हेडलाइन बनण्यासाठी…’
नाना पटोले यांचे स्टेटमेंट चुकीचे आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाइन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही अजित पवार यांनी सुनावले. यावेळी आमचेही काही पदाधिकारी त्यांनी घेतले आहेत. 15 वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवार खुपसत नाही आणि असे कधीही बोलतही नाहीत, असेही अजित पवार म्हणाले.
‘राज्यात सुरक्षित वाटावे हे सरकारचे काम’
मनसेचे बाळा नांदगावकर हे गृहमंत्र्यांना भेटले आहेत. प्रत्येकाला या राज्यात सुरक्षित वाटावे हे सरकारचे काम आहे. जी धमकी आली आहे किंवा जे काही माहिती त्यांनी दिली आहे, त्याबाबत गृहमंत्री निर्णय घेतील. कुणाला संरक्षण दिले पाहिजे याबाबत एक समिती असते. ते निर्णय घेतात, हेही सांगितले.
‘आम्हीही यूपीत जाऊन कार्यालय काढू शकतो’
कार्यालय कुठे काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात. यूपीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात भवन उभारणार आहेत त्याला आमचा विरोध नाही आम्हीही यूपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले.