पुन्हा शरद पवारांसोबत जाणार का?; अजित पवारांनी कोणती अट ठेवली?
Ajit Pawar on Sharad Pawar NCP Loksabha Election 2024 : शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाणार का? यावर अजित पवारांनी काय उत्तर दिलं? अजित पवारांनी कोणती अट ठेवली? टीव्ही 9 मराठीवर महामुलाखत, वाचा सविस्तर...
गेल्यावर्षी राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. सख्खे पुतणे अजित पवार यांनी काका शरद पवारांच्या विरोधात उभे ठाकले. आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचा निर्णय दिला. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अजित पवार यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत झाली. या मुलाखतीत अजित पवारांनी यावर उत्तर दिलं आहे. यावेळी अजित पवारांनी एक अट ठेवली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
आम्ही आज जी भूमिका घेतली, ती कुणाला योग्य वाटली तर पुढे काही घडू शकतं. इतरांना योग्य वाटली. त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य वाटली तर पुढे काही गोष्टी घडू शकते. उद्योगपतींच्या घरी अमित शहांसमोर बैठक घेतली काय झालं? लोकांना ते कळलं आहे. कितीही खोदून खोदून विचारलं तरी सांगणार नाही. माझ्या नादी लागू नका. माझ्या नादी लागू नका, असं अजित पवार म्हणाले.
शरद पवारांच्या विधानाला उत्तर
सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार असल्याचं शरद पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. हा सवाल तुमच्या मनात येत नाही. एक त्रयस्थ नागरिक म्हणून त्यांच्या घरात एखादी ४० वर्षापूर्वी आलेली सून तुम्ही बाहेरची म्हणू शकता? आपल्यामध्ये सुनेला काय मान सन्मान आहे. हे माहीत आहे. हे पिढ्यान पिढ्या चालत आलं आहे. ही सूनच नंतर घराची लक्ष्मी होते आणि तिच्याच हातात घऱ जातं. तिच नंतर पुढच्या पिढीला जन्म देते, वाढवते. म्हणून मी सांगितलं, असं अजित पवारांनी म्हटलं.
जे मनात आलं ते बोललो म्हणजे चुकलं का. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. चुकलं तर चूक कबूल करतो. अशाही घटना घडल्या. फार वर्षापूर्वी एक चुकीचा शब्द वापरला. त्यात राजकारण केलं. माझी बदनामी झाली. मी आत्मक्लेश केला. गावपातळीवरची सभा होती. पण त्याची किंमत आम्ही मोजली, असं अजित पवार या मुलाखतीत म्हणाले.