OBC Reservation : निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील; अजितदादांची ग्वाही
न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुका घेऊ, मात्र हे करत असताना ओबीसी आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भाटिया समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यानुसार काम सुरू असल्याचेही ते म्हणाले आहेत.
पुणे : निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कारागृहातील कैद्यांसाठी स्पर्धा भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचे उद्घाटन अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यामार्फत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) निवडणुकीसंदर्भात निर्णय दिला. त्यानंतर या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुका घेऊ, मात्र हे करत असताना ओबीसी आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
‘मध्य प्रदेशच्या धर्तीवर प्रयत्न करणार’
भाटिया कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. इम्पिरिकल डेटा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाहीदेखील अजित पवार यांनी यावेळी दिली आहे. राजकारण न करता ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रयत्न करू. मध्य प्रदेश सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर जागा पन्नास टक्क्यांच्या वर न जाऊ देता ओबीसींना प्रतिनिधित्व देण्याच प्रयत्न राहील. तशाप्रकारे कामालाही आम्ही सुरुवात केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्वांनीच आदर करायला हवा, असेही ते म्हणाले.
‘अधिकाऱ्यांशीही सकारात्मक बोलणी’
ज्या अधिकाऱ्यांशी बोलणे व्हायला हवे, त्या अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले आहे. त्यांनीही सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे शेवटी प्रयत्न करणे आपल्या हातामध्ये आहे. ते केले जातील. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठीच भाटिया समिती नियुक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मध्य प्रदेशने काय केले, यावर अभ्यास सुरू आहे. भाटिया समितीदेखील यावर काम करत आहे, असे ते म्हणाले. तर विरोधक काय म्हणत आहेत, काय टीका करत आहेत. याकडे लक्ष न देता आम्ही मनापासून प्रयत्न करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.