रोहित पवार बालमित्र मंडळाचे अध्यक्ष!, तुमची पक्षात काय लायकी आहे ते बघा…; कुणाचं टीकास्त्र?
NCP Ajit Pawar Group Leader Amol Mitkari on Rohit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांने रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षात आपली काय लायकी आहे, ते तपासा... असं त्यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांवर टीकास्त्र डागणारा नेता कोण? वाचा सविस्तर...
मुंबई | 20 मार्च 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात टीका टीकाटिपण्णी केली जात आहे. अजित पवार गटाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझी लायकी बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार हे काढत आहेत. मी शेतकऱ्यांच्या पोरगा आहे, ही माझी लायकी आहे. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात. तुमची पक्षात काय लायकी आहे ते बघा, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.
रोहित पवारांवर निशाणा
तुम्ही आता पक्षात अजित पवार बनण्याचा प्रयत्न करत आहात, ते कधीही होणार नाही. तुम्हाला माझं आव्हान आहे की, तुमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पुढील तीन दिवसात पक्षाची जबाबदारी दिली आहे, अस एक पत्र घेऊन यावं. जयंत पाटील त्यांच्या संघर्ष यात्रेत येत नाहीत. त्याचा किती विसंवाद आहे ते दिसून येत आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
मी पवार घराण्याच्या वादात पडण्याचं काही काम नाही. पण मी अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद हे काय उमटले आहेत ते तुम्हाला पण माहित आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
महायुतीत वाद?
जागावाटपावरून महायुतीत वाद असल्याची चर्चा होत आहे. त्यावर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडीमध्ये वाद नाहीत का? प्रकाश आंबेडकर यांची भूमिका कुठे आहे? त्यांनी संजय राऊत आणि नाना पाटोले यांच्या संदर्भातील भूमिका तुम्ही तपासा ना… त्यामुळे महायुती मधील काही वाद असतील तर ते सामंजस्य पद्धतीने मिटवली जाईल, असं अमोल मिटकरींनी म्हटलं.
नेत्यांच्या पक्षांतरावर म्हणाले…
बजरंग सोनावणे अजित पवारांची साथ सोडत पुन्हा शरद पवार गटात जाणार आहेत. त्यावर बोलताना बजरंग सोनवणे आणि निलेश लंके यांना राजकीय इच्छा मोठी जागी झाली असेल. त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेतली असेल. पण ते सोडून गेल्यामुळे काही फरक पडणार नाही, असं मिटकरी म्हणाले.