Mumbai Best Bus : अवघ्या 60 रुपयांत गणपती बघण्याचा ‘बेस्ट’ प्लान! मुंबईतले गणपती पाहण्यासाठी बेस्ट बसची हो-हो बससेवा
Mumbai Best Bus : सीएसएमटी, मेट्रो सिनेमा, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा, भायखाळा स्टेशन पूर्व, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर स्टेशन पूर्व, दादर टीटी आणि वडाळा डेपो, असा या बसचा मार्ग असेल.
मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai Ganesh Festival 2022) रात्रीच्या वेळी गणेश मंडळात गणपती बघायला जाणं, हा दरवर्षीचा ठरलेला प्लॅन. कोरोनामुळे गेली दोन वर्ष बंधन होती. मात्र यंदा सगळं सुरु झालंय. त्यामुळे गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या गणपती मंडळांना भेटी देण्याचा प्लॅन मुंबईकरांनी (Mumbai News) आखला आहे. मुंबईकरांच्या या प्लॅनला बेस्ट बस (Best Bus Mumbai) प्रशासनानंही मदतीचा हात दिलाय. रात्रीच्या वेळी गणपती बघायला जाणाऱ्यांना प्रवासात मदत व्हावी म्हणून बेस्ट बसने हो-हो बससेवा सुरु केली आहे. हो-हो म्हणजे होप ऑन-होन ऑफ! चढायचं, उतरायचं आणि पुन्हा चढायचं. पण तिकीट एकदाच काढायचं. अवघ्या 60 रुपयांत मुंबईकरांना एसी बसने वेगवेगळ्या गणेशमंडळांना भेटी देता येतील. दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळं असलेल्या मार्गावरुन या विशेष बस रात्रीच्या वेळी चालवल्या जाणार आहेत. मुंबईकरांना या बससेवेचा फायदा होईल, असा विश्वास बेस्ट बस प्रशासनाने व्यक्त केलाय.
रात्री 10 ते सकाळी 6 विशेष बेस्ट बस
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बेस्ट बस प्रशासनाकडून रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत विशेष बस सेवा चालवली जाणार आहे. 8 सप्टेंबरपर्यंत ही बस सेवा चालवली जाणार आहे. 25 मिनिटांच्या फरकाने प्रत्येक एक बस चालवली जाईल. रात्रीच्या वेळी गणेश मंडळांना भेट देण्यासाठी निघालेल्यांना या बस सेवेचा फायदा होणार आहे. अवघ्या 60 रुपयांचं तिकीट काढून मुंबईकरांना एसी बससोबत मर्यादित बस आणि सामान्य बसमधूनही प्रवास करता येऊ शकेल.
कुठून कुठपर्यंत?
मुंबईत रात्रीच्या वेळी चालवली जाणारी ही विशेष हो-हो बस सेवा सीएसएमटी ते वडाळा, अशी चालवली जाणार आहे. सीएसएमटी, मेट्रो सिनेमा, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा, भायखाळा स्टेशन पूर्व, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर स्टेशन पूर्व, दादर टीटी आणि वडाळा डेपो, असा या बसचा मार्ग असेल. बेस्टचे अधिकारी लोकेश चंद्रा यांनी ही माहिती दिली.
एका ठिकाणी उतरुन तिथल्या गणेश मंडळाला भेट दिली की पुन्हा दुसरी बस पडकून त्याच तिकिटावर प्रवाशांना पुढचा प्रवास करायला मिळावा, यासाठीही ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी प्रवाशांना प्रत्येकी 60 रुपये तिकीट काढावं लागणार आहे. 60 रुपयांच्या तिकीटात रात्रभर बेस्ट बसच्या होप ऑन होप ऑफ (हो-हो) सेवेचा लाभ घेता येऊ शकेल.
या शिवाय ओपन डेक डबल डेकर बसही रात्रीच्या वेळी चालवली जाते आहे. गणेश मंडळांना भेट देणाऱ्या प्रवाशांना या बसनेही प्रवास करत रात्रीची मुंबई अनुभवता येईल. रविवारपर्यंत 4 हजार प्रवाशांनी ओपन डेक डबलडेकर बसने प्रवास केलाय. गणेशोत्सव काळात रात्रीच्या वेळी अनेक प्रवाशांनी या बसने प्रवास करण्यास पसंती दिलीय. तर हो-हो बस सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालंय.