BMC अर्थसंकल्पात शिवसेनेकडून आकड्यांचा जुगाड; मुंबईकरांवर कर्जाचा बोजा पडणार?
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी 39,038.83 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. | BMC budget 2021
मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC Budget 2021) आज 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांवर सुविधांची खैरात करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र असल्याचे समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आकड्यांच्या जुगाडामुळे मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. (Mumbai BMC budget 2021)
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी 39,038.83 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. तो मागील वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 16.74 टक्क्यांनी जास्त आहे, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. परंतु हा अर्थसंकल्प हा फुगवून सांगण्यात आलेला आहे. सदरच्या अर्थसंकल्पामध्ये आयुक्तांनी राखीव निधीतुन रुपये 4000 कोटी काढून भांडवली खर्च करण्यात येईल व रुपये 5000 कोटीचे कर्ज घेण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे या कर्जाचा बोजा हा कुठे तरी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर येणार आहे, असा दावा समाजवादी पक्षाचे पालिका गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी केला.
कोरोनामुळे मुंबई महापालिकेचे कंबरडे मोडले, 10 हजार कोटींचा तोटा; उत्पन्न घटले
कोरोनामुळे मुंबई महापालिकेला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागल्याचं स्पष्ट झालं आहे. महापालिकेने आज 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला असून त्यात पालिकेला कोरोनामुळे सुमारे 10 हजार कोटीचा तोटा सहन करावा लागल्याचं दिसून आलं आहे.
महसूली उत्पन्न, मालमत्ता करात घट
पालिकेने 2020-2021 या आर्थिक वर्षात 22572.13 कोटीच्या महसूली वसुलीचे उद्दिष्टे ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात पालिकेच्या महसूली उत्पन्नात 5876.17 कोटी रुपयांची घट झाली आहे. पालिकेचं मालमत्ता कराचं उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. 2020-2021 या आर्थिक वर्षात पालिकेने 4500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या वसूलीचे उद्दिष्टे ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीत 2268.58 कोटीची घट झाली आहे. विकास नियोजन खात्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नातही पालिकेला 2679.52 कोटींची घट झाली आहे. मालमत्ता कर, महसुली उत्पन्न आणि विकास नियोजनातून मिळणारे उत्पन्न आदींची बेरीज करता पालिकेला यंदाच्या वर्षात 10,823.27 कोटींचं नुकसान सोसावं लागलं आहे. कोरोनामुळे हा तोटा झाल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या:
ऐकावं ते नवलंच, धारावीच्या पुनर्विकाससाठी 31.27 कोटींचा खर्च झाला; राज्य सरकारचा दावा
उद्धव ठाकरे आणि त्यांचा पार्टनर जमीन घोटाळा करणार होते; किरीट सोमय्यांचा नवा आरोप
मोठी बातमी : मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांचं नाव बदलणार
(Mumbai BMC budget 2021)