सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 35 लाखांची दंडवसुली

| Updated on: Oct 13, 2020 | 1:56 PM

नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याकरिता विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. social distancing rules

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 35 लाखांची दंडवसुली
bmc
Follow us on

मुंबई: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत 35 लाखांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अतिशय गरजेच्या अशा सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याकरिता विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत नियम मोडणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. (BMC Fines people not following social distancing rules)

त्यासोबतच या नागरिकांना समज मिळावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून आत्तापर्यंत 35 लाख 50 हजार 950 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 26 व्यक्तींकडून रू. 26 हजार आणि मास्क न लावणाऱ्या 3424 व्यक्तींकडून वसूल करण्यात आलेल्या 16,48,650 रुपयांचा समावेश आहे.

यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तीकडून रू. 1 हजार, मास्क न लावणा-या व्यक्तीकडून रू. 500/-, सुरक्षित अंतर न पाळणा-या व्यक्तीकडून रू. 200/- व सुरक्षित अंतराचे नियम मोडणा-या व्यापारी/दुकानदार यांचेकडून रू. 2 हजार अशाप्रकारे दंड वसूल करण्यात येत आहे. सुरक्षित अंतर न पाळणा-या 2242 व्यक्ती / व्यापारी, दुकानदार यांचेकडून रू. 18 लक्ष 76 हजार 300, अशाप्रकारे एकूण 35 लाख 50 हजार 950 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

लॉकडाऊननंतर ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने विविध गोष्टींना सुरूवात करण्यात आली आहे. तथापि ही सवलत दिली जात असताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या तीन महत्वाच्या सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तशा प्रकारच्या सूचना, जनजागृती विविध माध्यमातून सातत्याने केली जात आहे.

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने खुले केल्यानंतर कोव्हीच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे हीच प्रतिबंधात्मक ढाल आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक गांभीर्याने सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यांचे पालन न करण्याची बेफिकिरी दाखविणे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे काळात नागरिकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि महानगरपालिकेला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, अशी सूचना महापालिकेकडून करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Corona | पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर, मुंबईसह महाराष्ट्रालाही मागे टाकलं

(BMC Fines people not following social distancing rules)