Mumbai Boat Accident : “अजून 5 मिनिटे उशीर झाला असता तर…”, बाळासह प्रवास करणाऱ्या कुटुंबाने सांगितला बचावाचा थरार, अंगावर येईल काटा
मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात राहणाऱ्या वैशाली अडकणे हे त्यांच्या 14 महिन्यांचा मुलगा आणि कुटुंबीयांसह एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्या याच बोटीतून प्रवास करत होत्या आणि याचवेळी हा मोठा अपघात घडला.
Mumbai Boat Accident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ काल संध्याकाळी मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला. तर 114 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. अद्याप काही जण बेपत्ता आहेत. ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. मात्र, समुद्रात गेल्यानंतर या बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटने धडक दिली आणि ही बोट बुडाली. या दुर्घटनेत नौदलाच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेते एका 14 महिन्यांच्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे. त्याच्या कुटुंबाने बचाव कार्याचा संपूर्ण थरार सांगितला आहे.
नेमकं काय घडलं, बचाव कशा पद्धतीने करण्यात आला?
गेट वे ऑफ इंडियाजवळ बोट दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांकडून आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. यातील अनेकांनी हा घटनाक्रम कसा झाला, नेमकं काय घडलं, बचाव कशा पद्धतीने करण्यात आला, याचीही माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशांनी अंगावर काटा आणणारे अनुभव सांगितले. मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात राहणाऱ्या वैशाली अडकणे हे त्यांच्या 14 महिन्यांचा मुलगा आणि कुटुंबीयांसह एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्या याच बोटीतून प्रवास करत होत्या आणि याचवेळी हा मोठा अपघात घडला.
स्पीडबोट बोटीला धडकली, आमच्यासमोर एकाने जीव सोडला
वैशाली अडकणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर घटनाक्रम सांगितला. “आम्ही कुटुंबातील 8 जण सुट्टी असल्यामुळे एलिफंटाला फिरायला जात होते. आम्ही गेट वे ऑफ इंडियावरुन बोट पकडली. त्यात बसलो. आम्हाला बोटीत बसून 40 ते 50 मिनिटं झाली होती. त्याचवेळी एका पांढऱ्या रंगाची स्पीडबोट अत्यंत वेगाने येऊन आमच्या बोटीला धडकली. त्या धक्क्याने आम्ही जागेवरच पडलो. यादरम्यान स्पीड बोटमधील एक व्यक्ती उडून आमच्या बोटीवर पडला. त्याचा मृत्यू झाला होता. तर स्पीड बोटमधील दुसऱ्या व्यक्तीनेही जीव सोडला होता.”
“सुरुवातील आम्हाला काहीही झालं नाही, असं वाटलं. मात्र स्पीड बोटच्या जबरदस्त धडकेमुळे आमच्या बोटीला छिद्र पडले होते. काहीवेळाने ते लक्षात येताच आमच्या बोटीचा ड्रायव्हर लाईफ जॅकेट घाला, असे ओरडायला लागला. माझ्या भावाने आम्हा सगळ्यांना लाईफ जॅकेट दिले, आम्ही घातले. त्यानंतर काही क्षणात बोट एका बाजूला कलंडली आणि हळूहळू बुडायला लागली. यावेळी काहीजण बोटीखाली सापडले, तर काहीजण वाहत गेले”, असेही वैशाली अडकणे म्हणाल्या.
मला मुलाला वाचवायचे होते…
“आम्हीही जगण्याची आशा सोडली होती. पण लाईफ जॅकटमुळे आमचा जीव वाचला. आम्ही लाईफ जॅकेट घालून बोटीला धरुन तरंगू लागलो. मला काहीही करुन माझ्या 14 महिन्यांचा मुलगा शर्विलला वाचवायचे होते. सुरुवातीला माझ्या भावाने त्याला एका हाताने पाण्यावर उचलून धरले होते. त्यानंतर माझ्या भावाने त्याला खांद्यावर बसवले आणि बोटीचा आधार घेत तो तरंगत राहिला. आमचा हा अपघात झाल्यानंतर सुरुवातीची काही मिनिटे कोणीही मदतीला आले नाहीत. पण त्यानंतर सुदैवाने दोन-तीन बोटी आल्या आणि त्यांनी आमचा जीव वाचवला. जर अजून ५ ते १० मिनिटे वेळ गेला असता, तर आम्ही सर्वजण बुडालो असतो”, अशी घटना वैशाली अडकणे यांनी सांगितली.