रेल्वेस्थानकावरील या खाद्यपदार्थांना ग्राहक पंचायतीची हरकत

| Updated on: Dec 15, 2022 | 12:08 PM

'वन नेशन, वन प्रोडक्ट' या रेल्वे पुरस्कृत योजनेत रेल्वे स्थानकावर विकल्या जात असलेल्या खाद्य पदार्थांच्या पाकिटावर कायद्याने बंधनकारक अशी कोणतीही माहीती प्रदर्शित केली जात नसल्याची धक्कादायक बाब मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह अनिता खानोलकर यांनी पश्चिम रेल्वेच्या निदर्शनास आणली आहे.

रेल्वेस्थानकावरील या खाद्यपदार्थांना ग्राहक पंचायतीची हरकत
onenation_oneproduct
Image Credit source: onenation_oneproduct
Follow us on

मुंबई : रेल्वेने ‘वन नेशन, वन प्रोडक्ट’ या मिशन अंतर्गत रेल्वे स्थानकावर तेथील स्थानिक वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यास परवानगी दिली आहे. परंतू अशा स्टॉलवर खाद्यपदार्थही विकले जात असून त्यावर पॅकेजिंगची तारीख, एक्सपायर डेट दिली जात नसल्याची तक्रार मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.

‘वन नेशन, वन प्रोडक्ट’ या रेल्वे पुरस्कृत योजनेत रेल्वे स्थानकावर विकल्या जात असलेल्या खाद्य पदार्थांच्या पाकिटावर कायद्याने बंधनकारक अशी कोणतीही माहीती प्रदर्शित केली जात नसल्याची धक्कादायक बाब मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह अनिता खानोलकर यांनी उघड केली आहे. याबाबत त्यांनी पश्चिम रेल्वेकडे तक्रार केली आहे.

रेल्वे मंत्रालयाने महिला बचत गट तसेच छोट्या संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने ‘वन नेशन, वन प्रोडक्ट’ ही याेजना सुरू केली आहे. परंतू या याेजनेत रेल्वे स्थानकांवर काही ठिकाणी खाद्यपदार्थही विकले जात आहेत. या खाद्यपदार्थांची विक्री करताना काही महत्वाचे प्राथमिक नियम पाळले जात नसल्याचे उघडकीस आले आहे.

 

खाद्यपदार्थ विकताना काही पॅकेटवर खाद्यपदार्थांची माहीती दिली असली तरी ती अतिशय अपुरी आहे. आवेष्टित वस्तूंवर नियमानूसार वस्तूंचे नाव, वजन, बनविण्याची आणि खाण्यायोग्य असण्याच्या मुदतीची तारीख, घटक पदार्थ, एमआरपी, एफएसएसएआयच्या नोंदणीचा आणि परवान्याचा क्रमांक आदी माहिती असणे बंधनकारक आहे. अशी कोणतीही माहीती न देता हे पदार्थ सरसकट विकले जात आहेत.

केंद्र सरकारच्या रेल्वे सारख्या एका महत्वाच्या उपक्रमानेच केंद्र सरकारने केलेलेच कायदं धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची विक्री करावी याबद्दल मुंबई ग्राहक पंचायतीने आश्चर्य व्यक्त केले आहे. पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती (DRUCC)च्या त्रैमासिक सभेमध्ये या समितीच्या सदस्य या नात्याने अनिता खानोलकर यांनी वरील विषयासंबंधी तक्रार केली.

पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नीरज शर्मा यांनी या आक्षेपांची गांभिर्याने नोंद घेऊन सर्व स्टॉलवरील वस्तूंबाबत आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले. याबाबत  स्टेशन मॅनेजर यांच्यावर या स्टॉलचे वेळोवेळी इन्स्पेक्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचेही नीरज शर्मा यावेळी आश्वासन दिले आहे.