मुंबईच्या डब्बेवाल्यांची थेट पंतप्रधानांकडे मागणी, फेरीवाले यांच्याप्रमाणे आम्हालाही…

| Updated on: Jan 22, 2023 | 11:23 AM

केंद्र सरकार राबवत असलेले प्रकल्प आणि योजना याचा लाभ आम्हालाही मिळवा अशी मागणी करणारे पत्र मुंबईकर डब्बेवाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

मुंबईच्या डब्बेवाल्यांची थेट पंतप्रधानांकडे मागणी, फेरीवाले यांच्याप्रमाणे आम्हालाही...
HAWKERS AND DABBEWALA IN MUMBAI
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( narendra modi ) यांनी गुरुवारी मुंबईतील सुमारे ४० हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी केली. बीकेसी येथे झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या ( mumbai mahaplika ) प्रचाराचा नारळ फोडला. आघाडी सरकारच्या काळात विकासाचा वेग मंदावला होता. पण आता शिंदे-फडणवीस ( eknath shinde – devendra fadnavis ) डबल इंजिन सरकार वेगाने काम करत आहे. आम्ही कधी विकास कामात राजकारण आणले नाही. मात्र, मागील काळात वाईट अनुभव आला. छोटे फेरीवाले, दुकानदार यांच्यासाठी आणलेल्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

 

हे सुद्धा वाचा

मुंबईतील रस्ते नव्याने बनविण्यात येणार आहेत. मुंबईच्या विकासात मुंबई महापालिकेची भूमिका महत्वाची राहणार आहे. मुंबई पालिकेसाठी विकासाला प्रतिसाद देणारे प्रशासन हवे. नवे सरकार आल्यानंतर पंतप्रधान स्वनिधी योजनेने वेग घेतला. पाच लाख फेरीवाल्यांनी स्वारस्य दाखविले. त्यापैकी एक लाख लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले. तुम्ही दहा पावले चला, मी तुमच्यासोबत अकरा पावले चालायला तयार आहे, असे आवाहन मोदी यांनी केले होते.

काय आहे मागणी ?

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या आवाहनंतर मुंबईच्या डब्बेवाल्यांनी त्यांना पत्र पाठवले आहे. केंद्र सरकारने राबविलेले प्रकल्प आणि योजना यांचा लाभ मुंबईच्या डबेवाला कामगारालाही मिळाला पाहिजे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात डबेवाल्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले होते. अजूनही त्यातून आम्ही सावरलो नाही. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत व्यावसायिक बँक, आरआरबी, लघु वित्त पुरवठा करणाऱ्या बँक, एमएफआय आणि एनबीएफसी यांच्यामार्फत कर्ज उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे फेरीवाले यांना ज्यापद्धतीने कर्ज देण्यात आले त्याचआधारे डब्बेवाले यांनाही कर्ज देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

डब्बेवाला कामगार यांनाही पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून द्यावे. या कर्जाच्या माध्यमातुन व्यवसाय वाढविण्यास उपयोग होईल. व्यवसायात स्थिर होण्यासाठी या कर्जाचा उपयोग होऊ शकतो. योजनेच्या नियमाप्रमाणे डब्बेवाला त्या कर्जाची व्याजासह परतफेड करेल. त्यामुळे आम्हालाही मुद्रा योजने अंतर्गत कर्ज द्या, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले आहे. तसेच त्याची एक प्रत खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांना दिली आहे अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.