मुंबई : अंधेरीमध्ये माय लेकिंनी दागिन्यांच्या भांडणावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Andheri Daughter-Mother Suicide). यामध्ये आईचा मृत्यू झाला, तर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली (Andheri Daughter-Mother Suicide).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या वेळी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या प्रिया सागर नावाच्या 31 वर्षीय महिलेच्या काही दागिने दिसत नव्हते. म्हणून तिने यासंबंधी तिच्या आई कमल यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा कलम यांनी प्रियाला सांगितले की तिचे दागिने त्या सोमवारपर्यंत परत करतील. या कारणावरुन या माय-लेकिंमध्ये भांडण झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की प्रियाने फिनेल प्यायलं. मुलीने फिनेल प्यायल्यानंतर तिच्या वडीलांनी तिला तात्काळ कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केलं.
यादरम्यान, प्रियाची आई कमल घरातून बेपत्ता झाल्या. त्या कुठेही दिसत नाही म्हणून घरातील नोकराने त्यांचा शोध घेतला तेव्हा त्या जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असल्याचं त्याला दिसलं. त्यांनी घराच्या बालकनीतून उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.