मुंबईत 15 मजली इमारतीवरुन उडी, व्हिडीओ शूट करत हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या
'आत्महत्येसारखं अत्यंत टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे, त्यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये' असं शाह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील 15 मजली इमारतीवरुन उडी मारुन हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 61 वर्षीय धीरेन शाह यांनी प्रसाद चेंबर्स या व्यावसायिक इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आयुष्य संपवलं. (Mumbai Diamond merchant suicide) विशेष म्हणजे टॉवरवरुन उडी मारण्यापूर्वी धीरेन शाह यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.
शाह यांनी लिहिलेली दोन ओळींची सुसाईड नोटही पोलिसांना त्यांच्या डेस्कवर सापडली. ‘आत्महत्येसारखं अत्यंत टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे, त्यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये’ असं शाह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. डायमंड पॉलिशिंग आणि एक्सपोर्ट कंपनीचे मालक असलेल्या धीरेन शाह यांचं प्रसाद चेंबर्सच्या सर्वात वरच्या म्हणजेच पंधराव्या मजल्यावर ऑफिस आहे.
हेही वाचा – दागिन्यांवरुन वाद, मुंबईत तरुणीने फिनेल प्यायले, आईची इमारतीतून उडी घेत आत्महत्या
धीरेन शाह दररोजप्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या कार्यालयात आले. सकाळी 9.40-9.50 च्या सुमारास आपण इमारतीच्या टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी जात आहोत, असं काही कर्मचाऱ्यांना सांगितलं. मात्र काही मिनिटांतच त्यांनी टेरेसवरुन उडी घेतली.
इमारतीवरुन खाली पडल्यानंतर धीरेन शाह यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती डीबी मार्ग पोलिसांनी दिली. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.
शाह आपल्या कुटुंबासमवेत दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू नेपियनसी रोडवर राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. शाहांच्याच व्यवसायाची परदेशातील जबाबदारी तो सांभाळतो.
त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो, कौटुंबिक व्यवसायाची परदेशी व्यापारातील काळजी घेऊन. शाह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि कुटुंबीयांचे जबाब पोलिस नोंदवणार (Mumbai Diamond merchant suicide) आहेत.