Breaking : समीर वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव! अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी याचिका
: समीर वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे. वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय.
मुंबई : समीर वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे. वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकरणाचा तपास करत आहेत, अशावेळी एसआयटीची गरज काय? तसंच चौकशी करायची असेल तर सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केलीय. (Sameer Wankhede’s petition in Mumbai High Court seeking protection from arrest)
दरम्यान, समीर वानखेडे यांनी उचललेलं हे पाऊल अतिशय महत्वाचं मानलं जात आहे. कारण, यापूर्वी वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांना एक महत्वाचं पत्र लिहिलं होतं. त्यात मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला तरी माझ्यावर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, तरीही आता राज्य सरकारनं या प्रकरणाच्या तपासासाठी चार अधिकाऱ्यांच्या तपास पथकाची स्थापना केली आहे. एनसीबीच्या विरोधात ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या सगळ्यांची चौकशी आता एसीपी मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या कारवाईपासून संरक्षण मिळावं या मागणीसाठी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत वानखेडे यांनी असंही म्हटलं आहे की, जर या प्रकरणाची चौकशी करायची झालीच तर ती सीबीआयकडून करण्यात यावी.
वानखेडेंच्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध
वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी राज्य सरकारनं त्याला उच्च न्यायालयात विरोध केलाय. समीर वानखेडे यांच्याविरोधात चार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मुंबई पोलिस अधिकारी त्याचा तपास करत आहेत, हा तपास सध्या अगदी प्राथमिक अवस्थेत आहे. तूर्तास कुठेही गुन्हा नोंदवलेला नाही, त्यामुळे वानखेडे यांनी दाखल केलेली याचिका चुकीची आहे, अशी भूमिका राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात मांडण्यात आली आहे.
आरोपांच्या मालिकेनंतर एनसीबीची कारवाई थंडावली!
समीर वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर मागील चार दिवसांपासून कारवाई थंडावली आहे. गेल्या आठवड्याभरात एकही कारवाई किंवा धाड मारण्यात आलेली नाही. इतकंच नाही तर आर्यन खान प्रकरणातही कारवाई करण्यात आलेली नाही. एनसीबीला कारवाई करण्यास दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. काही दिवस कारवाई नको, असं आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात एनसीबी विरोधात अनेक गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत.
अनन्या पांडेलाही पुढे चौकशीला बोलावलं नाही
एनसीबीचे अधिकारी स्वत:च ड्रग्स प्लांट करतात, पैसे उकळतात अशा स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी झाली आहे. त्यानंतर तिला पुन्हा सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, पुढे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनन्याचं समन्स रद्द करण्यात आलं आहे. त्यानंतर तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. तसंच पुढे नवा गुन्हाही दाखल झालेला नाही. जुन्या गुन्ह्यातील आरोपीही शोधले जात नाहीत. त्यामुळे एकूणच सर्व आरोपानंतर एनसीबीची कारवाई ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे.
इतर बातम्या :
Sameer Wankhede’s petition in Mumbai High Court seeking protection from arrest