‘इस्टर्न फ्री वे’ला अजित पवारांनी सुचवलं ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं नाव
पूर्व द्रुतगती मार्गाला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव दिलं जाणार आहे.
मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव निश्चित झाल्यानंतर आणखी एका रस्त्याचं नामकरण होणार आहे. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गाला (इस्टर्न फ्री वे) दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव (Mumbai Eastern FreeWay Rename) दिलं जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला असून नगरविकास विभागाला त्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसूलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त, परिवहन यासारख्या विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.
विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना अजित पवार यांनी केली.
एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात आणि नागरिकांमध्ये त्याविषयी असलेला रोष याची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या.
रितेश देशमुखकडून आभार
श्री विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन श्री @AjitPawarSpeaks दादा. Eastern Free Way in Mumbai to be named after #VilasraoDeshmukh – https://t.co/H4HxXiuhL1
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 14, 2020
विलासरावांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख विधानसभेवर निवडून आले आहेत. धीरज पहिल्यांदाच आमदार झाले असून अमित देशमुख यांची ही तिसरी टर्म आहे. अमित देशमुखांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली असून त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाची धुरा आहे. Mumbai Eastern FreeWay Rename