मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टोलमाफीची घोषणा, आज रात्रीपासून अंमलबजावणीला सुरुवात
मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आजपासून किंवा उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कोणत्या वाहनांना टोलमाफी लागू असणार?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते. पुल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी १९९९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर २००२ मध्ये हे पाचही टोलनाके सुरु करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू झाली होती. गेल्या २२ वर्षांपासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल आकारण्यात येत आहे.
मनसेची वारंवार मागणी
यासाठी मनसे पक्षाकडून महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईतील सर्व टोल माफ करण्यात यावे, यासाठी मनसेकडून वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. या मुद्द्यासाठी अनेकदा राज ठाकरे यांनी आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली होती.
महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक?
सध्या सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे बोललं जात आहे. यामुळे आज मंत्रालयाबाहेर सर्वसामान्य नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात लगबग पाहायला मिळत आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके कोणाचे प्रश्न मार्गी लागणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधी विविध योजना आणि कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न पाहायला मिळत आहे.