आम्ही दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार : मुंबई उच्च न्यायालय
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी आम्ही मुळाशी जाऊ, अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे.
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी आम्ही मुळाशी जाऊ, अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. “कोणत्याही तपास संस्थेला आम्ही असंच जाऊ देणार नाही. महाराष्ट्रासारख्या आधुनिक राज्यात अशा खटल्यातील दोषींचा शोध लागत नसेल तर न्यायालय याबाबत चिंतीत आहे,” असंही न्यायालयाने नमूद केलं. विशेष म्हणजे यावेळी सीबीआय आणि एसआयटीने न्यायालयात आपण खटला सुरु करण्यास तयार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे लवकरच या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे (Mumbai High Court say We will go to the root of Dabholkar Pansare murder case).
‘दोन्ही तपास संस्थांच्या तपासावर न्यायालयाचं लक्ष’
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनिष पिताले यांच्या खंडपीठाने तपास संस्थांकडे खटला कधी सुरु करणार अशी विचारणा केली. यावर CBI आणि SIT ने खटला सुरु करण्याची तयार दाखवली. तसेच या खटल्याची सुनावणी सुरु असतानाही या हत्येच्या मोठ्या षडयंत्राचा तपास सुरु राहिल असंही नमूद केलं. दोन्ही तपास संस्थांच्या तपासावर आपण लक्ष ठेऊन असल्याचंही यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलं.
‘आम्ही दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार’
न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, “या हत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नाही अशी थोडीही शंका आम्हाला नको आहे. आम्ही या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेऊन असू. तपासात काय बाकी आहे आणि काय झालंय याबाबत देखरेख करु.” यावेळी दाभोळकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित वकिलांनी न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातल्यानेच हा खटला या टप्प्यापर्यंत आल्याचं सांगितलं. यावर न्यायालयाने आपण या प्रकरणाची मुळाशी जाऊ असं नमूद केलं.
पानसरे हत्या प्रकरणी 10 आरोपींना अटक, 2 फरार
या सुनावणीत एसआयटीने एका सिलबंद लिफाफ्यात या प्रकरणाची स्थिती न्यायालयासमोर सादर केली. यावेळी त्यांनी पानसरे हत्या प्रकरणी 10 आरोपींना अटक करण्यात आल्याचं सांगत 2 जण फरार असल्याचंही नमूद केलं. तसेच सर्व गोष्टी न्यायालयात सार्वजनिकरित्या सांगता येणार नाहीत आणि काही गोष्टी तर छापताही येणार नाहीत, असंही सांगितलं.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी हत्या झाली होती. इतके वर्षे उलटूनही या प्रकरणाचा खटला सुरु न झाल्याने पीडित कुटुंबाच्या वतीने काम पाहणाऱ्या वकिलांनी यावर प्रश्न उभे केले होते.
हेही वाचा :
डॉ. दाभोलकर हत्येचं बीड कनेक्शन समोर
लोकसभा निवडणुकीचं अचूक भविष्य सांगा आणि 21 लाख जिंका
व्हिडीओ पाहा :
Mumbai High Court say We will go to the root of Dabholkar Pansare murder case