राहुल गांधीसोबतच्या भेटीत काय घडलं?; काँग्रेसने नसीम खान यांची नाराजी कशी दूर केली?
How Congress removed Naseem Khans displeasure After Meeting Rahul Gandhi : नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आलं आहे. काँग्रेसने नसीम खान यांची नाराजी कशी दूर केली? राहुल गांधीसोबतच्या भेटीत नेमकं काय घडलं? नसीम खान यांची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर...
माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढण्याची नसीम खान यांची तयारी होती. मात्र या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नसीम खान नाराज झाले. प्रचारसभांसमध्ये जाणंही त्यांनी टाळलं. पण आता त्यांची नाराजी दूर झाली आहे. नसीम खान यांनी काँग्रेस प्रचारसमितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिला. त्यानंतर नसीम खान यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पुण्याच्या सभेत राहुल गांधी आणि नसीम खान यांची भेट घडवून दिली. त्यानंतर नसीम खान यांची नाराजी दूर झाली.
अन् नसीम खान यांची नाराजी दूर
मल्लिकार्जुन खर्गे आणि नसीम खान यांच्यात बोलणी झाली. यात नसीम खान यांना काही आश्वासनं देण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय मुस्लिम समाजाचही नसीम खान यांनी काँग्रेसमध्येच राहावं, यासाठी आग्रही होता. या सगळ्याचा परिपाक म्हणून नसीम खान यांची नाराजी दूर झाली आहे. शिवाय काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या रायगडच्या महाविकास आघाडीच्या सभेतही नसीम खान सहभागी झाले होते.
नसीम खान काय म्हणाले?
नसीम खान यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे. मी समाजाची भावना पक्षाला मांडली होती. माझं वैयक्तिक काही नव्हतं. समाजाची भावना ही पक्षाला कळवली. प्रत्येक समाजाला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची आहे, असं नसीम खान म्हणाले.
मी वर्षा गायकवाड आणि सर्व उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहे. काल मी अलिबागमध्ये उध्दव ठाकरे यांच्या सोबत सभेला होतो. वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करणार त्यांना मी भेटणार आहे. नसीम खानला कुठल्याच आश्वासनाची गरज नाही. कुठलीही तडजोड झाली नाही, असंही नसीम खान म्हणाले.