प्रवाशांनो लक्ष असू द्या रेल्वेकडून इमर्जन्सी ब्लॉक, मुंबईची लोकल पुन्हा थांबणार
मध्य रेल्वेने सीएसएमटी ते मस्जिद स्थानकादरम्यान तीन तासांचा इमर्जन्सी ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच 1,2 व 3 फेब्रुवारीला मोठ्या ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे.
![प्रवाशांनो लक्ष असू द्या रेल्वेकडून इमर्जन्सी ब्लॉक, मुंबईची लोकल पुन्हा थांबणार प्रवाशांनो लक्ष असू द्या रेल्वेकडून इमर्जन्सी ब्लॉक, मुंबईची लोकल पुन्हा थांबणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mumbai-local.jpg?w=1280)
मुंबईकरांसाठी लोकल संदर्भात महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील कर्नाक ब्रिजच्या कामानिमित्त सीएसएमटी ते मस्जिददरम्यान ब्लॉक घेणे सुरूच आहे. या महिन्याच्या 25,26 आणि 27 जानेवारीला मोठा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु या दरम्यान या ब्रिजचे काम पूर्ण न झाल्याने आता पुन्हा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर यात 1,2 व 3 फेब्रुवारीला मोठ्या ब्लॉकचे नियोजन केले असून आता आणखीन ब्लॉकची यात भर पडणार आहे. ती म्हणजे आज मध्यरात्री 12.30 ते 3.30 वाजता या दरम्यान सीएसएमटी, मस्जिद या स्थानकांदरम्यान इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो रेल्वेचे वेळापत्रक पाहून नियोजन करा.
तर तुम्ही सुद्धा लोकल ट्रेनच्या शेवटच्या लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सीएसएमटीहून 29 जानेवारीला शेवटची लोकल रात्री 12.24 ऐवजी 12.12 वाजता सुटणार आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटी ते मस्जिद स्थानकादरम्यान कर्नाक ब्रिजच्या बांधकामासाठी 3 तासांचा आपत्कालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॉकदरम्यान आरओबीवरील गर्डर समायोजनाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
सीएसएमटी ते मशीद स्थानकादरम्यान रात्री 12.30 ते पहाटे 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान मेन लाइनवर भायखळा ते सीएमएमटी आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते सीएमएमटी दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही. भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन सेवा थांबतील आणि सुटतील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत धावतील.
मुख्य मार्गावरील शेवटची लोकल
स्लो डाऊन मार्गावरील सीएसएमटी-कर्जतसाठी शेवटची लोकल रात्री 12.12 वाजता सुटणार आहे.
स्लो अप मार्गावर सीएमएमटीची शेवटची लोकल डोंबिवलीहून रात्री 10.48 वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल
स्लो डाऊन मार्गावरील कर्जतसाठी पहिली लोकल सीएसएमटीहून पहाटे 4.47 वाजता सुटणार आहे.
स्लो अप मार्गावरील सीएसएमटीसाठी पहिली लोकल कल्याणहून पहाटे 3.23 वाजता सुटेल.
हार्बर मार्गावरील शेवटची लोकल
डाऊन मार्गावरील सीएसएमटी-पनवेल शेवटची लोकल रात्री 12.13 वाजता सुटेल.
अप मार्गावरील सीएसएमटीसाठीची शेवटची लोकल पनवेलहून रात्री 10.46 वाजता सुटेल
ब्लॉकनंतर पहिली लोकल
डाऊन मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल ही पहिली लोकल पहाटे 4.52 वाजता सुटणार आहे.
अप मार्गावरील सीएसएमटीसाठी पहिली लोकल वांद्रे येथून पहाटे 4.17 वाजता सुटणार आहे.
मडगाव-सीएसएमटी एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवण्यात येतील. या सगळ्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे.