Mumbai Local train Update : लोकल सुरु व्हावी ही मुख्यमंत्र्यांची इच्छा, येत्या दहा दिवसात निर्णय, वडेट्टीवारांची घोषणा
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सुरु व्हावी, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचं वडेट्टीवार म्हणाले
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल (Mumbai Local) पुन्हा सुरु होण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मात्र मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु व्हावी, ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची इच्छा आहे. येत्या दहा दिवसात याबाबत निर्णय होईल, अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. (Mumbai Local likely to restart in 10 days says Vijay Wadettiwar)
मुंबईतील लोकल ट्रेनबाबत लवकर निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थांबलेली मुंबई सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु व्हावी, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“डिसेंबरच्या शेवटच्या 15 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण, रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण आणि कोरोनाच्या दुसरी लाट याचा विचार करु. नवीन वर्षात लोकलला पुन्हा रुळावर आणू आणि सर्वसामान्यांसाठी ही सेवा सुरु करु, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केला होता.
नऊ महिन्यांपासून लोकलला रेड सिग्नल
गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबरनंतर सुरु होण्याचे संकेत मिळत होते, मात्र या निर्णयाला पुन्हा एकदा खो मिळाला. कोरोनाचा धोका पाहता डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासन नजर ठेवणार आहे. यानंतरच लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती.
मुंबईत नाईट कर्फ्यू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल. नवीन वर्ष उंबरठ्यावर आहे. नाताळपासूनच नववर्षाचा जल्लोष सुरु होतो. या काळात नागरिकांकडून हलगर्जी होऊ नये आणि कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस अनेक जण रात्रभर सेलिब्रेशन करतात. मात्र घराबाहेर एकत्र जमून होणाऱ्या जल्लोषावर मर्यादा यावी, यासाठी अतिरिक्त बंधनं घालण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या :
लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये नो एंट्री, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच, मुंबई महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण
(Mumbai Local likely to restart in 10 days says Vijay Wadettiwar)