Mumbai Local Mega Block : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! आज तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, मुंबईकरांचे…वेळापत्रक कोलमडणार
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम मार्गांवर आज मेगा ब्लॉक आहे. रुळांची दुरुस्ती, सिग्नल आणि इतर कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अनेक लोकल रद्द किंवा उशिराने धावतील. प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचे आणि रेल्वेचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Local Mega Block News : असंख्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही आज रविवारच्या निमित्ताने फिरण्याचा प्लॅन केला असेल, तर मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे आज रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच सर्व उपनगरीय सेवा काही मिनिटे उशिराने असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर कल्याण- बदलापूरदरम्यानच्या पुलाच्या पायाभूत कामासाठी आज रात्रकालीन विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ – कर्जत लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना काही काळ थांबावे लागणार आहे. काही लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण आणि बदलापूरदरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी आज रात्रकालीन अप आणि डाऊन मार्गावर, तसेच उड्डाणपुलाचे गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी दोन क्रेनचा वापर करून पायाभूत कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री १.३० वाजता ते रविवारी पहाटे ४.३० पर्यंत ब्लॉक सुरू असेल. या ब्लॉक कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच, काही लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांना ठाण्याला थांबा देण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉकचे वेळापत्रक
हार्बर रेल्वे मार्गावर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ यादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4.40 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत ठाणे ते पनवेल/वाशी/नेरुळदरम्यान धावणाऱ्या ट्रान्स-हार्बरवरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. यामुळे हार्बरवरील लोकल वेळेवर धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिर या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५ वाजेर्यंत हा मेगाब्लॉक असेल. यादरम्यान ब्लॉक वेळेत अप-डाउन जलद मार्गावरील लोकल अप-डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द असतील. तर काही लोकल विलंबाने धावणार आहे. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.