मुंबई: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी खास अॅपचा वापर केला जाणार आहे. राज्य सरकारकडून तयार करण्यात येणाऱ्या या अॅपचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे अॅप येत्या दोन दिवसांत कार्यरत होईल. मुंबईतील 65 रेल्वे स्थानकांवर या अॅपच्या माध्यमातून तिकीट-पाससाठी क्युआर कोड दिला जाईल. तर वॉर्ड स्तरावर ऑफलाईन सेवेच्या माध्यमातून तिकिटासाठी क्युआर कोड मिळवता येईल.
लोकल प्रवासासाठी (Mumbai Local) दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे (BMC commissioner) आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Chahal) यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे जरी दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. म्हणेज 14 दिवसांची अट पूर्ण करावी लागणार आहे.
याबाबत इक्बालसिंह चहल म्हणाले, “काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल, मात्र दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस व्हावे लागतील, त्यानंतरच हा पास मिळेल”
येत्या काळात शिथील झालेल्या निर्बंधाचा लाभ घेण्यासाठी हा फोटोपास आत्यावश्यक असेल. रेस्टॉरंट, जीम, मॉल अशाठिकाणी देखील अशा पासची गरज पडेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे असेल. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत मुंबईतील 18 वर्षावरील 90 लाख लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, असा विश्वास आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असे आवाहन केले.
संबंधित बातम्या
मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप