मुंबई: राज्यातील कोरोनाची (Coronavirus) साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सामान्य प्रवाशांसाठी कधी खुली होणार, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. (Mumbai local train may start for normal passengers soon with new formula)
कमी गर्दीच्या वेळेत सरसकट सर्व प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यानुसार सामान्य लोकांना सकाळी सात वाजणयापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळू शकते. या काळात रेल्वे सेवेवरचा ताण कमी असतो. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका तुलनेत कमी आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून या प्रस्तावाची चाचपणी सुरु असून लवकरच मुंबईतील लोकल ट्रेनचे नवे वेळापत्रक जाहीर होऊ शकते.
गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबर आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून सुरु होईल, अशी चर्चा होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.. कोरोनाचा धोका पाहता डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासन नजर ठेवणार आहे. यानंतरच लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती.
सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात आहे. मृत्यूचेही प्रमाण कमी झाले आहे. तसेच मुंबईतील जवळपास सर्व दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत. त्यामुळे आता लोकल ट्रेनला यामधून वगळण्यात काही अर्थ नाही, असा मतप्रवाह मुंबईकरांमध्ये दिसून येत आहे.
संबंधित बातम्या:
थांबलेली मुंबई धावणार, लोकल लवकरच सुरु होणार : विजय वडेट्टीवार
मुंबई लोकल 1 जानेवारीपासून सुरू करण्याचा विचार, मंत्री वडेट्टीवारांची माहिती
लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये नो एंट्री, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
(Mumbai local train may start for normal passengers soon with new formula)