Mumbai Local : सकाळी 7 च्या अगोदर आणि रात्री 9 नंतर प्रवास करणार कोण?
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही. | Mumbai Local train News Updates
मुंबई : राज्य सरकारने येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय घेताना प्रवाशांना वेळेचं बंधन घालून दिलं आहे. सकाळी 7 च्या अगोदर प्रवास करण्यास परवानगी, नंतर 7 ते 12 प्रवासाला बंदी, परत 12 ते 4 प्रवास करण्यास मुभा आणि 4 ते 9 प्रवासास बंदी, असे जाचक नियम सरकारने ठेवले आहेत. मग असे नियम असताना प्रवास करणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Mumbai Local train News Updates open for all passengers 1 february 2021 time table)
प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या लोकांना किंवा सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या लोकांना सध्या सुरु केलल्या लोकलचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करु शकतील.
मुंबईकरांनी शिस्त पाळावी
लोकल सुरु झाल्यावर मुंबईकरांनी शिस्त पाळावी, असं आवाहन प्रवाशांनी शिस्त पाळली तरच मुंबईची लोकल पूर्वपदावर येईल, असं प्रशासनाने म्हटलं आहे.
‘मूर्ख सरकारचं ऐकू नका, प्रवास करा’
“शासनाने प्रवाशांना घालून दिलेल्या वेळेच्या बंधनावर मनसेने आक्रमक भूमिका घेतलीय. मूर्ख सरकारचं ऐकू नका”, असं म्हणत नागरिकांनी बिनधास्त प्रवास करावा, असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
‘मुंबई लोकलही आता पुर्वीप्रमाणे धावावी’
भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी मात्र सरकारच्या निर्णयावर संयमी भूमिका घेतली. ते म्हणाले, “मला वाटतं की सगळीकडे आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकलही आता पुर्वीप्रमाणे धावावी आणि गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईकरांची होत असलेली तारांबळही थांबावी”
सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा, अशी विनंती मुख्य सचिवांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे. दरम्यान, या बाबतीतली सुचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.
विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे.
(Mumbai Local train News Updates open for all passengers 1 february 2021 time table)
हे ही वाचा :