मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात येत होता. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (Mumbai Local Train Start Soon said CM Uddhav Thackeray)
कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामन्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत.
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करावी अशी मागणी केली जात होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकलमध्ये काही ठराविक व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला होता.
दरम्यान आज (25 जानेवारी) मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
यावेळी मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईकरांची लाईफलाईन सर्वांसाठी सुरु होणार असल्याचे बोललं जात आहे. (Mumbai Local Train Start Soon said CM Uddhav Thackeray)
मुंबई विद्यापीठातही राज्यपालांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेचे डावपेच https://t.co/PZ6ILObAzE @BSKoshyari @PawarSpeaks @OfficeofUT @AUThackeray @ShivSena #bhagatsinghkoshyari #shivsena #governor
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
संबंधित बातम्या :