मुंबईकरांनो लक्ष द्या, मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक, प्रवाशांचे मेगा हाल
मुंबई लोकलवर २६ ते २८ नोव्हेंबरपर्यंत सलग तीन दिवस ब्लॉक असणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डातील सिग्नल सिस्टम अपग्रेड करण्यासाठी हा ब्लॉक आहे. यामुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहेत.
Mumbai Local Mega Block News : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलवर सलग तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डातील सिझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्वीचच्या नूतनीकरणासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या २६, २७ आणि २८ नोव्हेंबर असे तीन दिवस हा विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर सातत्याने नूतनीकरणाची काम सुरु आहेत. काही आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांसाठी ब्लॉक घेतला होता. यात काही ठिकाणी प्लॅटफॉर्म विस्तारीकरण, ट्राफिक यंत्रणा आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. यानंतर आता उद्यापासून सलग तीन दिवस विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डातील सिझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्वीचच्या नूतनीकरणासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या नूतनीकरणानंतर सिग्नल यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल. तसेच गाड्यांची गती वाढविणे शक्य होईल
सध्या मध्य रेल्वेवर अनेक सिझर क्रॉसिंग या जुन्या आणि झिजलेल्या अवस्थेत आहेत. यात सिझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्वीच बदलल्यामुळे रेल्वे रुळांवरील अपघातांची शक्यता कमी होईल. तसेच प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. अधिक कार्यक्षम यंत्रणेमुळे गाड्या वेळेवर धावतील. त्यामुळे प्रवाशांना उशीर होण्याचा फटका बसणार नाही. यासोबतच अपग्रेडेशनमुळे यार्डची क्षमता वाढेल. त्यामुळे भविष्यात अधिक गाड्या चालवणे शक्य होईल, असे सांगण्यात येत आहे.
ब्लॉकचा कालावधी
मध्य रेल्वेवरील हा ब्लॉक रात्री घेतला जाणार आहे. २६, २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी रात्री हा ब्लॉक घेतला जाईल. मंगळवार रात्री १२.५० ते पहाटे ५.५० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. त्यानंतर बुधवार रात्री १२.४० ते पहाटे ५.४० वाजता आणि गुरुवारी रात्री १.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. या काळात काही एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.
कोचुवेली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस या गाड्या फक्त ठाण्यापर्यंत धावतील. त्यासोबतच विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस, अयोध्या छावणी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील. तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर ही गाडी ३०-४० मिनिटे उशिराने सुटेल. तसेच बुधवारी २८ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर ही एक्सप्रेस ४० मिनिटे उशिराने सुटेल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या छावणी ही गाडी २० मिनिटे उशिराने सुटेल.