मुंबईकरांचा ‘मेगा’खोळंबा, तीन रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; पाहा संपूर्ण वेळापत्रक
उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Mumbai Local Mega Block News : असंख्य मुंबईची आणि मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबईकरांचा आज मेगाखोळंबा होणार आहे. आज रेल्वेच्या मध्ये, हार्बर आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे आज रविवारी या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व उपनगरीय सेवा किमान 15 मिनिटे उशिराने सुरु असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो पर्याय मार्गाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?
मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 या वेळेत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक माटुंगा आणि मुलुंड या स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविली जाईल. त्यामुळे या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकावर थांबतील. यानंतर या गाड्या अप आणि डाऊन मार्गावरुन ठाणे आणि माटुंगा या स्थानकानंतर पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वेची स्थिती काय?
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान देखभाल दुरुस्तीच्या अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4.05 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉक काळात पनवेल ते वाशी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. याचा परिणाम मुंबईहून पनवेलकडे आणि ठाण्याकडून पनवेलकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या उपनगरीय सेवांवर होणार आहे.
हार्बर रेल्वेवर प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. तसेच ठाणे, वाशी, नेरुळ या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत.
या मेगाब्लॉकच्या काळात पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद असतील. तर सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/ बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद असतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल येथे जाणारी डाऊन ट्रान्स हार्बर लाईन सेवा बंद आहे. सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉक
तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणरा आहे. आज सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या कालावधीत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील उपनगरीय सेवा जलद मार्गावरून चालवल्या जातील. तसेच ब्लॉक काळात चर्चगेटपर्यंत येणाऱ्या काही फेऱ्या वांद्रे किंवा दादरपर्यंत खंडित केल्या जातील.