दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबई लोकलची सेवा कोलमडली, पश्चिम रेल्वेवर मोठा खोळंबा
उधना ते गोरखपूर यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. २५ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत या विशेष गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहेत.
Mumbai Local Train Update : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकात इंजिन फेल झाल्याने अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकादरम्यान इंजिन फेल झाले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेसही पालघर स्थानकावर रखडली आहेत. केळवे रोड स्थानकात झालेल्या बिघाडामुळे पालघर ते विरार, आणि पालघर ते चर्चेगेट या दिशेने धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत आहेत.
दरवर्षी दिवाळी आणि छट पुजेसाठी लाखो उत्तर भारतीय मुंबईतून उत्तर प्रदेशला जात असतात. मुंबईहून उत्तर प्रदेशात जाण्यासाठीच्या अनेक गाड्या या पश्चिम रेल्वेमार्गे धावतात. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. उधना ते गोरखपूर यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. २५ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत या विशेष गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहेत.
प्रवाशांचा मोठा खोळंबा
दरम्यान दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केळवे स्थानकात झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क लागला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशी संतप्त झाले आहेत.