कुठे प्रचाराचा नारळ फुटणार, तर कुठे सामुहिक राजीनामे; भाजपने उमेदवार यादी जाहीर करताच घडामोडींना वेग
Maharashtra BJP candidates List announced : कुठे नाराजीचा सूर तर कुठे उत्साह, तर कुठे सामुहिक राजीनामे....; भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर करताच घडामोडींना वेग आला आहे. 'या' मतदारसंघात चुरस वाढली... कोणत्या मतदारसंघात नाराजी पाहायला मिळतेय? वाचा सविस्तर...
मुंबई | 14 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर होत आहेत. काल संध्याकाळी भाजपने देशातील लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. अशात राज्यात घडामोडींना वेग आला आहे. कुठे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. तर कुठे नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. यातच काही मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याने रावेरमधल्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुण्यात आजपासून प्रचाराला सुरुवात
भाजपने काल जाहीर केलेल्या उमेदवार यादीत मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा समावेश आहे. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपतीचं सकाळी 11 वाजता ते दर्शन घेतील. त्यांनंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये पुण्यातून मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी
नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दहा वर्षात केलेले विकास कामांमुळे पुन्हा मला उमेदवारी मिळाली असल्याचा विश्वास हिना गावित यांनी व्यक्त केला. पक्षी श्रेष्ठींनी दिलेली जबाबदारीची आभार व्यक्त केलेत. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पार पडणार आहे. येणाऱ्या काळात विकासाचे कामावर अधिक भर देणार तर भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. कोणी कितीही विरोध केला तरी पक्ष चांगल्या परफॉर्मस काम करणाऱ्याला जबाबदारी देत असतं, असं गावित म्हणाल्या. दरम्यान हिना गावित यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोध होता.
रावेरमध्ये नाराजीचा सूर
जळगावच्या रावेरमध्ये राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्ते नाराज झाले आहेत. रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट जाहीर झाल्याने रावेर लोकसभेतील भाजप इच्छुक एक गट नाराज झाल्याची माहिती आहे. इच्छुक उमेदवार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल सावळे यांचे तिकीट कापल्याने हा नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे.
रावेरच्या भालोद इथे हजारो भाजपाचे कार्यकर्ते जमा होऊन नाराजी व्यक्त करत आहे. सामूहिक अनेक जण भाजपचा राजीनामा या ठिकाणी देत आहेत, असं पत्र समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. आज रावेर लोकसभेची जागा जाहीर झाली अमोल जावळे यांना डावलण्यात आलं. पुन्हा अन्याय झाल्याने लोकसभा मतदारसंघात आम्ही यापुढे भाजपाचे काम करणार नाही, अशा आशयाचे सामूहिक सक्षरी करण्याचे मोहीम सुरू झाली आहे. अशी माहिती प्राथमिक मिळाली आहे.