मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen supply) भासत आहे. मुंबई प्रशासनाने मात्र ही स्थिती मोठ्या हिमतीने हाताळली. मुंबईच्या नियोजनाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा केले. सोबतच केंद्र सरकारला मुंबई पॅटर्न समजून घेण्याची आदेशवजा सूचनासुद्धा केली. मात्र, याच कारणामुळे आता राज्यातील शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सेना-भाजप नेते ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन एकमेकांवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका असे म्हणत मुंबईत अजूनही बेड मिळत नाहीत. लसीकरणाचा गोंधळ आहे, असा आरोप केला. तर कोर्टाने केंद्राची कानऊघडणी केली आहे. त्यांनी आतातरी बोध घ्यावा असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे चिमटे काढले आहेत. (Mumbai Mayor Kishori Pednekar criticizes BJP over protest Corona vaccination and Oxygen supply)
मुंबईत भाजप नगरसेवकांनी 5 मे रोजी आंदोलन केले. त्यांनी लस तुटवडा तसेच इतर कोरोनाविषयक सुविधांची वानवा असल्याचा आरोप केला. तसेच मुंबई मनपा कोरोनाविरोधात नियोजन करण्यासाठी संपूर्णपणे फोल ठरले आहे, अशी टीकासुद्धा केली. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी भाजपचे नगरसेवक आंदोलन करणार आहेत हे मला माहिती असते, तर मोफत लसीसाठी मी स्वत: सहभागी झाली असते, अशा शब्दात चिमटा काढला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची कानउघडणी केली आहे. मुंबई महापालिकेकडून आपण काही शिकू शकता का? असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. दिल्लीला होत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. त्याचा बोध आतातरी संबंधितांनी घ्यावा, असेदेखील पेडणेकर म्हणाल्या.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका
तर कोर्टाने मुंबई महापालिकेचे कौतुक केल्यानंतर प्रविण दरेकर यांनीसुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली होती . त्यांनी “कोर्टाने कौतुक केलं ही चांगली बाब आहे. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. मुंबईत आज बेड मिळत नाहीत. लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. याकडे लक्ष द्यायला हवं, अशा खोचक शब्दात मनापाला सल्ला दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत केंद्र सरकारने मुंबई प्रशासनाकडून माहिती घ्यावी. त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा कसा व्यवस्थित ठेवला हे पाहावे. त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेता येतात का तेही पाहावे, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.
दरम्यान, कोर्टाच्या याच वक्तव्यानंतर राज्यात मोठं राजकारण रंगलं आहे. शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत.
इतर बातम्या :
लय भारी! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिव्हीरच्या उत्पादनाचा परवाना
महाराष्ट्राची लसीकरणात आघाडी कायम, लसीचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक
(Mumbai Mayor Kishori Pednekar criticizes BJP over protest Corona vaccination and Oxygen supply)