मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी मुंबईत तर झपाट्याने संसर्ग वाढतोय. सध्या मुंबईत 20 हजारपेक्षा जास्त सक्रिय कोरोना (Corona) रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, रुग्णांची संख्या वीस हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितले होते. पेडणेकर यांच्या या भाष्यानंतर आता पुढे काय होणार ? मुंबईत खरंच लॉकडाऊन लागणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.
“संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. पण काही नागरिक बेफिकीर राहिले तर आगामी काळात लॉकडाऊन करावा लागू शकतो. घाबरण्यापेक्षा काळजी घ्या. आपण प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत. डॉक्टर्स, बेस्टचे कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. ओमिक्रॉन हा गंभीर स्वरुपाचा नाही, असं समजू नका. तसं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. त्याला गंभीर समजलं तर पुढे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
सध्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार नसला तरी मुंबईत विकएंड लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना “आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शरद पवार यांच्याशी बोलून योग्य निर्णय घेतला जाईल. शनिवार आणि रविवारी विकएंड असल्यामुळे या दोन दिवसात मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. त्यामुळे धोकापातळी ओंलाडताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक निर्णय खंबीरपणे घेत आहेत. संध्याकाळी सात वाजेपर्यंत काय निर्णय आहे तो समजेल. निर्बंधामध्ये वाढ होऊ शकते. सौम्य लक्षणांची रुग्णसंख्या बरीच आहे. धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर धावपळ उडेल, ही धावपळ वेळीच रोखली जावी, यासाठी उद्धव ठाकरे घिसाडघाईने निर्णय घेणार नाहीत. ते योग्य निर्णय घेतील. सध्यातरी लॉकडाऊन लागणार नाही. मात्र मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
इतर बातम्या :
Omicron in India| पंतप्रधान आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्यता; कोरोना संकटावर होणार मंथन
KDCC Bank Election Result : कोल्हापूर जिल्हा बँक मतमोजणी, पन्हाळा तालुक्यातून विनय कोरे विजयी
Nashik Omicron| सर्व यात्रांवर बंदी, लसीकरण न झाल्यास कटू निर्णय; मंत्री भुजबळांनी काय दिला इशारा?