मुंबईचे महापौर आजपासून राणीच्या बागेत, नव्या बंगल्यात प्रवेश!
मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आज नवीन बंगल्यात प्रवेश करणार आहेत. भायखळा इथल्या जिजामाता उद्यानातील महापालिकेच्या बंगल्यात महापौर महाडेश्वर आजपासून राहायला येत आहेत. दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे महापौरांचं निवासस्थान बदलण्यात आलं आहे. महापौरांसाठी आता राणीच्या बागेतील बंगला निवासस्थानासाठी देण्यात आला आहे. नवं महापौर निवास्थान कसं […]
मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आज नवीन बंगल्यात प्रवेश करणार आहेत. भायखळा इथल्या जिजामाता उद्यानातील महापालिकेच्या बंगल्यात महापौर महाडेश्वर आजपासून राहायला येत आहेत. दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे महापौरांचं निवासस्थान बदलण्यात आलं आहे. महापौरांसाठी आता राणीच्या बागेतील बंगला निवासस्थानासाठी देण्यात आला आहे.
नवं महापौर निवास्थान कसं आहे? भायखळ्यातील राणीच्या बागेत नवं महापौर निवासस्थान आहे. या बंगल्यात आधी अतिरिक्त आयुक्त राहात होते. मात्र महापौरांसाठी त्यांनी हा बंगला रिकामा केला आहे. राणीच्या बागेतील हा बंगला दादरच्या महापौर बंगल्यापेक्षा मोठा आहे. 6 हजार स्क्वेअर फूट परिसरात हा बंगला आहे. या बंगल्याची साफसफाई, रंगरंगोटीचं काम पूर्ण झालं आहे. आजपासून महापौर विश्वनाथ महाडेश्वर या बंगल्यात राहतील.
या बंगल्याच्या परिसराचं एकूण क्षेत्रफळ 17 हजार चौरस फूट इतकं आहे, मात्र बंगल्याचं बांधकाम सहा हजार चौरस फूट जागेवर करण्यात आलं आहे. दोन मजली बंगल्यात खाली आणि वर अशा दोन्ही मजल्यांवर प्रत्येकी चार-चार म्हणजेच एकूण आठ खोल्या आणि दोन हॉल आहेत.
दादरचं महापौर निवासस्थान कसं होतं? दादरमधील महापौर निवासस्थान हे 1932 पासून पालिकेच्या ताब्यात आहे. त्याकाळी या बंगल्यात महापालिकेचं कार्यालय होतं. जवळपास 30 वर्षांनी म्हणजेच 1962 पासून या इमारतीला महापौर निवासस्थान म्हणून घोषित करण्यात आलं. तेव्हापासून इथे मुंबईचे महापौर निवास करतात. हा बंगला एकून तीन मजली आहे. तळमजला आणि वर दोन मजले असं याचं स्वरुप आहे. हा बंगला जवळपास अडीच एकर जागेत पसरला आहे. 4 हजार 500 चौरस फूट अशी या बंगल्याच्या परिसराची व्याप्ती आहे. या बंगल्याला ‘हेरिटेज’ दर्जा प्राप्त आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन दरम्यान, 23 जानेवारीला दादर इथल्या महापौर बंगल्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमीपूजन होणार आहे. 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जयंती दिन आहे. त्यामुळे याच दिवशी होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारक गणेश पूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 23 जानेवारीला महापौर बंगला शिवाजी पार्क इथे एका छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमु उद्धव ठाकरे यांचं आमंत्रण स्वीकारलं आहे. त्यामुळे 23 जानेवारीला पुन्हा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकत्र दिसणार आहेत.
कसा असेल कार्यक्रम?
23 जानेवारीला महापौर बंगला शिवाजी पार्क इथे सकाळी 11 वाजता होणार गणेश पूजन होईल. उद्धव ठाकरे आणि महापौर पूजेला बसतील. मुंबईचे पहिले नागरिक या नात्याने महापौर पूजेला बसतील. कार्यक्रम अत्यंत छोटेखानी असेल. या कार्यक्रमाला फक्त ठाकरे कुटुंबातील व्यक्ती, मुख्यमंत्री, शिवसेना नेते, मंत्री,आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नसल्याचं समजतयं. कार्यक्रम मोठा केला तर स्मारकाच्या विषयावरुन पुन्हा शिवसेनेवर टीका होईल म्हणून कार्यक्रम फार गाजावाजा न करता अत्यंत छोट्या स्वरुपात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आधीच बेस्ट संपामुळे शिवसेना याबाबत सावध झाली आहे. म्हणून या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली नाही. पण सगळ्यांना अधिकृत आमंत्रण गेले आहेत. काम अपूर्ण असल्यामुळे फक्त गणेश पूजन करणार आहेत.