मुंबई : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून सामाजिक वातावरण बिघडलेलं आहे. राज्याच्या अनेक भागातून दंगलीचे, सामाजिक वातावरण बिघडण्याचे वृत्त दररोजच ऐकायला येत आहे. काही दिवसाआधी औरंगजेबावरुन राज्यात चांगलच वातावरण तापलं होतं. अशातच आता मुंबईतील मिरा भाईंदरच्या एका सोसायटीत बकऱ्यावरुन भांडण झालंय. बकरी ईदच्या आधी एका कुटुंबानं बकरा घरात आणल्यानं हा वाद झालाय. हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय.
पाहा व्हिडीओ-
सोसायटीत बकरा आणला म्हणून मिरा रोडमध्ये तणाव निर्माण झाला. मिरा रोडमधल्या ‘जे पी इन्फ्रा’ या गृहसंकुलात राहणाऱ्या मोहसीन खान यांनी ईदसाठी बकरा घरात आणला पण सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी त्याला विरोध केला. मोहसीन खान आपल्या पत्नीसह बाहेरुन येत असतानाच सोसायटीच्या वॉचमननं त्यांची गाडी रोखली.
सोसायटीतले रहिवासीही मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी खान आणि सोसायटीतले रहिवासी यांच्यात मोठा वाद होऊन धक्काबुक्की झाली. मोहसीन खान हे सोसायटीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. आपण बकरा केवळ घरात आणून ठेवला असून संकुलाच्या आवारात त्याची कुर्बानी देणार नाही असं मोहसीन खान यांनी सांगितलं, तरीही रहिवासी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी सोसायटीतल्या रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे 3 ते 4 तास हा प्रकार सुरुच होता. सोसायटीतल्या रहिवाशांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. काहीजणांनी हनुमान चालिसेचंही पठण केलं. याप्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारण किरकोळ होतं. ते सामंजस्यानं मिटवताही आलं असतं, पण याला धार्मिक स्वरुप मिळालं शेवटी पोलिसांनाच यात हस्तक्षेप करावा लागला.