राष्ट्रवादी पक्षाबाबतचा निर्णय आल्यानंतर रोहित पवारांनी महाभारताचं उदाहरण दिलं; ट्विट करत म्हणाले…
Rohit Pawar on Election Commission Decision about NCP Symbol and Name Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्षाबाबतचा काल निर्णय आला. या निर्णयानंतर आमदार रोहित पवारांनी महाभारताचं उदाहरण दिलं... त्यांनी ट्विट करत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये काय म्हटलंय? पाहा...
मुंबई | 07 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्षाच्या आणि घड्याळ चिन्हाच्या बाबत काल निर्णय आला. या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. निवडणूक आयोग हे भाजपचं विंग झालं दिसून येत आहे. इलेक्शन कमिशनच्या प्रमुखाच्या नियुक्तीचा अधिकार पूर्णपणे सत्तेतील लोकांचा आहे. त्यामुळे कालच्या निकालावर काय बोलणार? असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह जरी दिलं असलं तरी. ज्या माणसाने पार्टी सुरू केली तो बाप माणूस आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला कशाचीही भीती नाही, असं रोहित पवार म्हणाले. शिवाय रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. यात रोहित पवार यांनी महाभारताचं उदाहरण देत अजित पवारांवर टीका केली आहे.
रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं
महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अहंकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला… भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहीजे? तेंव्हा अर्जुनाने सांगितलं तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला. नंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल. म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला…
कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय..
‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं त्यातून प्रेरणा घेऊन आदरणीय पवार साहेब हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार!
महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या… pic.twitter.com/BNM65ZRHPM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 7, 2024
दादांनी पक्षावर कब्जा केला- रोहित पवार
ज्या नेत्यांना शरद पवार यांनी मोठं केलं आहे, त्यांनीच पार्टीवर कब्जा केला आहे. त्यांनी पार्टीचा किंवा कुटुंबाचा विचार केला नाही. ते ऑफिसचा विचार करतील का? हा प्रश्न आहे असं आ रोहित पवारांनी म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीने घर बांधलं आणि त्यावर तुम्ही कब्जा घेत असाल. एखादा सातबारा एखाद्या व्यक्तीच्या नावावर आहे. तुम्ही दबाव तंत्राचा वापर करून त्यावर कब्जा घेत असाल तर आम्हाला कोर्टात जाऊन न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयांचा ताबा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे यावर रोहित पवार बोलले आहेत.