मुंबईकरांनो या वेळेतच फटाके फोडा, हायकोर्टाचा नवा आदेश, पालीकेचेही आवाहन
मुंबई देखील प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीच्या वाटेवर असून मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडताना वेळेचे भान राखण्याचे आवाहन केले आहे. आता मुंबईकरांना केवळ या वेळेतच फटाके फोडावेत आणि कमी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत असे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.
मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक शहरांतील प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. दिल्ली प्रदूषणाच्या बाबतीत पृथ्वीवरील सर्वाधिक धोकादायक शहर असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. मुंबई देखील प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीच्या वाटेवर असल्याचे धोकादायक चित्र आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुंबई महानगर पालिकेने रात्री 8 ते 10 या दोन तासांतच फटाके फोडण्याचे आवाहन केले आहे. या दोन तासांत कमी प्रदूषण होईल असेच फटाके फोडण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.
भारतीय संस्कृतीचा सर्वांचा आवडता दिवाळीचा सण सुरु झाला आहे. अंधारातून प्रकाशात जाण्याचा संदेश देणारा दीपोत्सव साजरा करताना सामाजिक भान बाळगण्याची गरज आहे. दीपोत्सव आपल्याला चांगले आणि योग्य वागण्याची शिक्षण देत असतो. मुंबईकरांना यंदा प्रदुषणाबाबत अधिक सजग होण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानूसार यंदाच्या दीपोत्सवात रात्री 8 ते 10 या कालावधीत कमी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत असे आवाहन पालीकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी केले आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण
गेल्याकाही दिवसांत मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढली असून हवेची गुणवत्ता ढासळली आहे. AQI एअर क्वालिटी इंडेक्स धोकादायक पातळीवर पोहचला आहे. हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अस्थमा आणि श्वसनाचे विकार वाढले आहेत. पालिकेने बांधकामाच्या साईटवर रस्ते धुण्यासह अनेक उपाय योजन्यास सांगितले आहे. शहरात मेट्रोची कामे सुरु आहेत. त्यातच मुंबईतील वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढल्याने मुंबईत हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत जर प्रदूषण रोखले नाही तर प्रकल्प थांबविण्यात येतील अशी तंबी दिली आहे. मुंबईत अधिक धोकादायक प्रदूषण निर्माण करणारे फटाके फोडू नयेत असे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.