मुंबईत इतके हजार झाडं लावण्याचा संकल्प, पर्यावरण दिनी लावलेली झाडं जगवणार कोण?
मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. यंदादेखील जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्यान विभागाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
मुंबई : मुंबईकरांच्या अवतीभवती सदा वृक्षराजी बहरलेली असावी. यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने येत्या वर्षभरात मुंबईमध्ये नवीन २५ हजार झाडे लावण्याचा विशेष संकल्प केला आहे. उद्या सोमवारी, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिवसभरात महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रात प्रत्येकी २०० पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. वर्षभरात नागरी वन उपक्रमात आणखी ५० हजार झाडे लावली जाणार आहेत.
मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन आणि संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सतत नवनवीन उपक्रम हाती घेतले जातात. गत अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाचे कार्य अखंडपणे सुरू असल्यानेच मुंबईकरांच्या अवतीभोवती वृक्षराजी दाटलेली आढळते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, उपायुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
जागतिक स्तरावर दखल
मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन आणि संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल अलीकडे जागतिक स्तरावरदेखील घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) आणि आर्बर डे फाउंडेशनकडून (Tree Cities of The World) “जागतिक वृक्ष नगरी ” हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार सन २०२१ आणि २०२२ अशी सलग दोन वर्ष मुंबई महानगराला मिळाला आहे.
मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. यंदादेखील जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्यान विभागाकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचा एक भाग २५ हजार वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
वर्षभरात ५० हजार झाडं लावणार
५ जून रोजी उद्यान विभागाकडून सर्व २४ विभागांमध्ये प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येकी २०० झाडे लावण्यात येणार आहेत. येत्या वर्षभरात मुंबईमध्ये पारंपरिक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्याचा मानस आहे. याशिवाय नागरी वने (मियावाकी) पद्धतीने वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. प्रामुख्याने सोनचाफा, सीता अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, जांभूळ, नारळ, कडूनिंब, आंबा, पेरू, करंज, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहनही या निमित्ताने करण्यात येणार आहे.