हरी नरके यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं, जिवाभावाचा मित्र गमावला; छगन भुजबळ-कपिल पाटील भावूक

| Updated on: Aug 09, 2023 | 2:18 PM

Hari Narke Passed Away : 83 साली मैत्री झाली, त्यांनी तुरुंगवासही भोगला, चालता बोलता ज्ञानकोश हरपला; हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचं वर्तुळ हळहळलं

हरी नरके यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं, जिवाभावाचा मित्र गमावला; छगन भुजबळ-कपिल पाटील भावूक
Follow us on

मुंबई | 09 ऑगस्ट 2023 : फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर पुरोगामी चळवळीतून दु:ख व्यक्त केलं जात आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि आमदार कपिल पाटील यांनी आपला मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अभ्यासू व्यक्तीमत्व गमावल्याचं म्हटलं आहे. हरी नरके यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी दु:ख व्यक्त केलं.

हरी नरके यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचा मोठं नुकसान झालं आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे. चळवळीला मोठा धक्का बसला आहे. फुले शाहू आंबेडकरांचा खरा इतिहास पुढं आणायचं काम ते करत होते.अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहे. परदेशातही त्यांची व्याख्यानं व्हायची. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं ते चालत बोलत विद्यापीठ होतं, असंही भुजबळ म्हणाले.

हरी नरके यांचं निधन चटका लावून जाणारं आहे. त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र साहित्य प्रकाशित करणाऱ्या समितीचे ते अध्यक्ष होते. ओबीसी समाजाच्या चळवळीत त्यांचा मोठा सहभाग राहिला.अवघ्या साठाव्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांची 56 पुस्तक प्रकाशित झाली आहेत. आज माझा जिवाभावाचा मित्र गेला. हरी नरके हे कायम लक्षात राहतील, असं आमदार कपिल पाटील म्हणालेत.

राष्ट्र सेवा दल अध्यक्ष नितीन वैद्य यांनीही हरी नरके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. हरी नरके यांचं अकाली जाण धक्कादायक आणि दुखः द आहे. 1983 पासूनचे आमचे संबंध होते. चळवळी दरम्यान त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. जोतिराव फुले आहे सावित्रीबाई फुले यांचे ते चालत फिरत विद्यापीठ होतं. परखड विचारवंत आणि अभ्यासू असे ते आमचे मित्र होते. पुरोगामी चळवळीचा चालता बोलता ज्ञानाकोश आज हरपला. मनोहर भिड यांनी जेव्हा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला होता. तेव्हा आवाज उठवण्यात ते अग्रगण्य होते, असं म्हणत नितीन वैद्य यांनी यांनी आठवणी सांगितल्या.

नाना पटोले यांनी हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सामाजिक आणि बहुजनांचा आवाज असणारं हे विद्वान व्यक्तीमत्व हरी नरके यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मागच्या आठवड्यात त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. आताही त्यांच्यासोबत चर्चा करणार होतो. पण आज अचानकपणे त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. त्या जाण्याने वैचारिक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराला दुःख पेलण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना, असं पटोले म्हणालेत.