Mumbai News : बेफिकीर चालकांविरुद्ध ई-चलानचा धडाका; वाहतूक पोलिसांनी सात महिन्यांतच ओलांडला गेल्या वर्षीचा पल्ला

| Updated on: Jul 24, 2023 | 12:54 PM

वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनचालकांच्या बेजबाबदारपणाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Mumbai News : बेफिकीर चालकांविरुद्ध ई-चलानचा धडाका; वाहतूक पोलिसांनी सात महिन्यांतच ओलांडला गेल्या वर्षीचा पल्ला
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई / 24 जुलै 2023 : देशाची आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत वाहनचालक सुस्साट वागू लागले आहेत. त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी अशा बेफिकीर वाहन चालकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक मोठ्या प्रमाणावर तक्रारी नोंदवत आहेत. तक्रारींचा वाढता ओघ विचारात घेऊन पोलिसांनी प्रमुख गुन्ह्यांसाठी अधिक ई-चलान जारी करण्यास सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांमध्ये दारुच्या नशेत गाडी चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी नेणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. लोक अशा गुन्ह्यांतील गुन्हेगार वाहन चालकांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करीत आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. परिणामी, मागील सात महिन्यांत जारी केलेल्या ई-चलानचे प्रमाण हे 2022 च्या संपूर्ण वर्षातील ई-चलानपेक्षा अधिक आहे.

मद्यपान करुन आणि चुकीच्या बाजूने गाडी चालवल्याप्रकरणी अधिक ई-चलान

मुंबई वाहतूक पोलिसांनी वर्ष 2022 च्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत मद्यपान करून वाहन चालवणे आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवणे यासारख्या प्रमुख गुन्ह्यांसाठी अधिक ई-चलान जारी केले आहेत. अनेकदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. वयोवृद्ध आणि आजारी लोक गाडीला हात दाखवत असले तरी रिक्षाचालक वा टॅक्सीचालक गाडी थांबवत नाहीत. त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चलान जारी करुन त्यांच्यावर दंडाचा बडगा उगारला गेला आहे.

भाडे नाकारल्याप्रकरणी 2 लाख 29 हजार चलान जारी

वाहतूक पोलिसांकडील अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलैच्या मध्यापर्यंत भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांविरुद्ध तब्बल 2 लाख 29 हजार चलान जारी करण्यात आले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2022 दरम्यान ही आकडेवारी खूपच कमी होती. मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल केवळ 38 चलान जारी करण्यात आले होते. तसेच भाडे नाकारल्याप्रकरणी गेल्या वर्षी 1.49 लाख चलान देण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

या वर्षी पहिल्या सात महिन्यांतच चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे यावर अधिक कारवाई करण्यात आली. चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल 25,724 आणि सीटबेल्ट न घातल्याबद्दल 1.31 लाख चलान जारी करण्यात आले. 2022 मध्ये, चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल केवळ 6,370 गुन्हे आणि सीटबेल्ट न लावता वाहन चालवल्याबद्दल 1.21 लाख गुन्हे नोंदवले गेले.

2020 मध्ये एकाही व्यक्तीला जादा भाडे आकारल्याबद्दल चलान देण्यात आली नाही, तर यावर्षी उल्लंघन केल्याबद्दल 806 जणांना चलान देण्यात आले. प्रवाशांच्या अधिक मागणीमुळे त्यांच्या मोहिमेला गती देण्यात आली आणि यामुळे जास्त चालना आल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.