Vande Bharat Express | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा, सोलापूर-शिर्डीत प्रवास आणखी आरामदायी
मुंबईतील सीएसटी रेल्वे स्टेशनवर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला.
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज मुंबई ते शिर्डी तसेच मुंबई ते सोलापूर (Mumbai Solapur) वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबईतील सीएसटी रेल्वे स्टेशनवर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 17 वरून मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर देशातील या नवव्या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना तुळजापूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांवर ही ट्रेन थांबेल. त्यानंतर काही मिनिटांच्या अंतराने प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरून मुंबई ते शिर्डी या दहाव्या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात आलं.
पंतप्रधान काय म्हणाले?
सीएसटी स्टेशनवरून सोलापूर आणि शिर्डीकडे जाणाऱ्या दोन्ही वंदे भारत ट्रेन रवाना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून भाषण केलं. भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून केली. ते म्हणाले, ‘रेल्वेच्या क्षेत्रात आज मोठी क्रांती होतेय. नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होतोय….’
यानंतर मोदींनी पुढील भाषण हिंदीतून केलं. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, इतर महाराष्ट्राचे मंत्री, आमदार, खासदार व इतर बंधू-भगिनी…
आजचा दिवस महाराष्ट्रातील आधुनिक कनेक्टिव्हिटिच्या दृष्टीने खूप मोठा आहे. प्रथमच एकाच दिवशी दोन वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. मुंबई आणि पुणे या शहरांना आधात्मिक ठिकाणांना जोडेल. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, पर्यटक, भाविकांसाठी या ट्रेन महत्त्वाच्या आहेत.
शिर्डीत साईबाबांचं दर्शन घ्यायचं असेल, नाशिकचं रामकुंड, त्र्यंबकेश्वर, पंचवटीचं दर्शन करणं वंदे भारत ट्रेनमुळे सोपं होईल. मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आई तुळजाभवानीचं दर्शन सुलभ होणार आहे.
वंदे भारत ट्रेन सह्याद्री पर्वतांतून जाईल, तेव्हा प्रवाशांना खूप आनंद मिळेल. नव्या वंदे भारत ट्रेनसाठी जनतेला शुभेच्छा देतो.
आधुनिक भारताचं चित्र…
वंदे भारत एक्सप्रेसमुळे भारताची सांस्कृतिक- आर्थिक प्रगती होतेय, याचं वर्णन करताना मोदी म्हणाले, ‘ आधुनिक भारताचे हे खूप शानदार चित्र आहे. हे वेगवान भारताचं प्रतिबिंब आहे. देश खूप वेगाने वंदे भारत ट्रेन लाँच करत आहे. आतापर्यंत 10 ट्रेन सुरु झाल्या आहेत. 17 राज्यांतील 108 जिल्हे वंदे भारत एक्सप्रेसशी कनेक्ट झाले आहेत.
एकेकाळी खासदार पत्र लिहित होते, आमच्या क्षेत्रात स्टेशनवर ट्रेन थांबवण्याची विनंती करत होते. आता देशभरातील खासदार येतात तेव्हा आमच्याकडेही वंदे भारत ट्रेन पाठवा, अशी विनंती करतात. आज मुंबईतील नागरिकांचं जीवन सुलभ करण्यासाठी कॉरिडोअरचं लोकार्पण झालंय. त्यामुळे इस्ट-वेस्ट कनेक्टिव्हिटी सोपी झाली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. मुंबईकरांना यासाठी मी शुभेच्छा देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.