दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट; नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना
राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. | Delhi blast
मुंबई: दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या (Delhi Blast) पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई आणि पुण्यातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आल्याचे समजते.
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील इस्रायली दूतावास आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 29, 2021
मुंबई आणि पुण्यातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
दिल्ली स्फोटानंतर मुंबई विमानतळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. तर पुण्यातील सर्व संवेदनशील ठिकाणावरील बंदोबस्तासाठी असणार्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना सर्तकतेचे आदेश देण्यात आल्याची माहिती पुणे शहर पोलिस दलातील विशेष शाखेचे उपायुक्त मितेश गट्टे यांनी दिली आहे.
दिल्लीतील स्फोटानंतर अमित शाह सक्रिय, सातत्याने पोलिसांच्या संपर्कात
दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाला होता. जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जातीने या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. ते सातत्याने दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत आहेत.
Union Home Minister Amit Shah is in touch with senior Delhi police officials and is constantly monitoring the situation.
(file pic) pic.twitter.com/RORCmW8ogg
— ANI (@ANI) January 29, 2021
दरम्यान, काहीवेळापूर्वीच स्फोट झालेल्या ठिकाणी फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले आहे. हे पथक हा स्फोट नेमका कशाच्या साहाय्याने घडवण्यात आला, हे शोधण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी दिल्ली पोलीस आणि बॉम्बशोधक पथकानेही घटनास्थळाची कसून तपासणी केली.
आयईडी स्फोटकांचा वापर?
हा स्फोट आयईडी स्फोटकांद्वारे घडवण्यात आल्याचा अंदाज आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अब्दुल कलाम मार्ग हा दिल्लीतील VVIP परिसरा आहेत. या परिसरात अनेक देशांचे दूतावास आहेत. त्यामुळे इथली सुरक्षाव्यवस्था कडेकोट असते. तरीही याठिकाणी स्फोट घडल्याने दिल्लीतील सर्व सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.