प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीत, ते…; बड्या नेत्याच्या विधानाने भुवया उंचावल्या
Prakash Shendge on Prakash Ambedkar Vanchit and Mahavikas Aghadi : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीबाबत बड्या नेत्यानं विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीत, असं या नेत्यानं म्हटलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर...
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9, मुंबई | 09 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते. अशात प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीत, असं प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केलंय. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकरांबाबत वक्तव्य
प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने आम्हाला असं वाटत आहे की ते महाविकास आघाडी सोबत जाणार नाही. ते आमच्या सोबत स्वतंत्र लढतील. ते आमच्यासोबत जर स्वतंत्र लढले तर बहुजनांची ताकद ओबीसींची ताकद आणि दलितांची ताकद ही राज्यात यंदा निर्णायक ठरेल, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
मराठा आरक्षणावर भाष्य
मराठ्यांनी जो उठाव केला यानंतर जरांगे पाटील म्हणालेले आहेत की, यावेळी भाजपला मतदान करणार नाही. गावोगावी निषेध केला जाईल. अगदी त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा आमची रणनीती आखतोय. ओबीसी देखील यांना मतदान करणार नाही जो ओबीसी इतकी बात करेगा वही देश में राज करेगा, असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.
शेंडगे यांचा घणाघात
आचारसंहिता जवळ आलेली आहे. या सरकारनं ओबीसी हिताचे कुठलेही निर्णय घेतलेले नाहीये. एक पैसाही एक रुपयाचा निधी सुद्धा ओबीसी समाजाला या सरकारने दिला नाहीये. त्यामुळे अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. राज्यात मराठा आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा समाजामध्ये टीआरपी प्रचंड वाढलेला आहे. परंतु हा वाढलेला टीआरपी भाजपाला पाहवत नाहीये. त्यांच्या वाटेच्या खासदारकीच्या जागा कमी करून ते टीआरपी कमी करण्याचे काम करत आहेत, असा घणाघातही शेंडगे यांनी केला आहे.