सलग सुट्ट्यांमुळे ट्रॅफिक जाम! मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर टोलजवळ मोठी कोंडी, CNGसाठी मोठी रांग
Mumbai Pune Express Highway : मुंबईतून मोठ्या संख्येनं पर्यटक शहराबाहेर निघाले असल्याचं पाहायला मिळालंय. त्याचा परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झाला आहे.
सलग सुट्ट्यांमुळे जर तुम्ही फिरायला जाण्याचं प्लानिंग केलं असेल, तर त्याआधी तुम्हाला वाहतूक कोंडीच्या विघ्नावर मात करावी लागणार आहे. सलग सुट्ट्या लागून आल्याने अनेकांनी मुंबईबाहेर (Mumbai) जाण्यासाठी प्लान आखले. पण पिकनिकसाठी बाहेर पडलेल्यांच्या आनंदावर ट्रॅफिकने विरजण टाकलंय. मुंबईतून मोठ्या संख्येनं पर्यटक शहराबाहेर निघाले असल्याचं पाहायला मिळालंय. त्याचा परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस (Mumbai Pune Express Highway) हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्यात जात असताना लागणारा पहिलाच टोलनाका असलेल्या मुंबई पुणे एक्स्प्रेस वे पार करण्यासाठी लोकांना नेहमीपेक्षा तिप्पट ते चौपट वेळ लागतोय. खालापूर टोल (Khalapur Toll) नाक्याजवळ वाहनांच्या दोन ते अडीच किलोमीट लांब वाहनांच्या रांगा लागल्यात. फास्टॅगमुळे वाहनांच्या टोलवर रांगा लागणार नाही, असा जो विश्वास व्यक्त केला जात होता, तोही यानिमित्ताने फोल ठरल्याची चर्चा रंगलीय. लोणावळा, पुणे यासह इतर पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाण्याला पर्यटकांची पहिली पसंती असते. मात्र या एक्स्प्रे्स महामार्गावर असलेल्या टोलजवळील वाहतूक कोंडीचा नाहक मनस्ताप पर्यटकांना सहन करावा लागतोय.
Huge traffic on Mumbai Pune expressway towards pune road upto tollway.Why not free the road? #Mumbaipune #traffic #mumbaipuneroad #expressway #toll pic.twitter.com/1llIh5CAsP
हे सुद्धा वाचा— Smita (@drsmita7) August 13, 2022
वाहनांच्या लांबच लांब रांगा
शनिवारी रविवारची सुट्टी आणि त्यासोबत स्वातंत्र्यदिनासह पारशी नववर्षाची सुट्टी सलग जोडून आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येनं मुंबईबाहेर जात आहेत. मात्र वाटेत होत असलेल्या वाहतूक कोंडीने सगळ्या प्लॅनिंगचं वेळापत्रकही कोलमडलंय. आधीच मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांची संख्याही वाढलेली असल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलेला असतो. त्यात आता सलग सुट्ट्यांनी वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे अधिकच भर पडलीय.
Why its always traffucked @nitin_gadkari Mumbai-Pune expressway disappoints Everytime even though after charging huge money its been waste of money and time even on tolls they dont agree to not charging on tolls @MumbaiPolice please do assist getting rid of this huge traffic. pic.twitter.com/A7zinQanbB
— Sumit More (@SumitMore1492) August 13, 2022
गेल्या आठवड्याभरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा पावसाळी सहलींचं मोठ्या संख्येनं आयोजन करण्यात आलं. सलगच्या सुट्ट्या डोळ्यांसमोर ठेवूनच महिनाभर आधी सहलीचे बेत आखले गेले. पण फक्त हायवेवरीलच कोंडी नव्हे तर पेट्रोल पंपावरील गर्दी, हायवेवरील हॉटेल्समधील कोंडी, या सगळ्यामुळे अनेकांचा बेत फसलेत.
मुंबईत सीएनजीसाठी रांगा..
पेट्रोलच्या तुलनेने स्वस्त म्हणून सीएनजी वाहनांची संख्याही वाढलेली आहे. अशात सीएनजीसाठीही मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. काही ठिकाणी अचानक सीएनजी संपल्यामुळे ग्राहकांचा खोळंबाही झालाय. एकूण सलगची सुट्टी अनेकांना मजा मस्तीची कमी आणि मनस्तापाची जास्त जात असल्यानं पिकनिकच्या उत्साहावर पाणी फेरलंय.