मोरया रे… आतुरता गणरायाच्या आगमनाची, आज घरोघरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार
Ganeshotsav 2024 Prana Pratishtapana : लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. घराघरातील आणि गणपती मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज आहेत. आज घरगुती आणि सार्वजनिक गणपती मंडळात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. वाचा सविस्तर...
आज गणेश चतुर्थी… महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सवाची आजपासून सुरवात होत आहे. या मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात आगमन करून त्यांची विधिवत पूजा करण्यात येत आहे. उत्सवांचे माहेरघर असलेल्या लालबाग-परळ भागात तर गणेशभक्तांनी गर्दी केली आहे. जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची सर्वाधिक गर्दी केलीय. तर पुण्यातही गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज आहेत. पुण्यामध्ये गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचं वाजत गाजत आगमन होणार आहे.
दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना कधी?
पुणेकरांचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या जटोली शिव मंदिराच्या प्रतिकृती मंदिरात दगडूशेठ विराजमान होणार आहे. सकाळी 11 वाजून11 मिनिटांनी ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. थोड्याच वेळात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढली जाणार आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी
लालबागचा राजाचं यंदाचं वर्ष ९१ वं वर्ष आहे. लालबागचा राजाची प्राणप्रतिष्ठा पूजा विधिवत आणि पंरपरेप्रमाणे दिनांक पहाटे चार वाजता सुरू झाली. लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी पहाटे 6 वाजल्यापासून सर्व भाविकांसाठी सुरू होणार आहे. चरणस्पर्श आणि मुखदर्शन अशा दोन रांगाद्वारे गणेशभक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकतात.
आज राज्यभर नाहीतर देशभर गणेश चतुर्थीचा सण आनंदात साजरा होत आहे आणि मुंबईमधल्या चिंचपोकळीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 105 वं वर्ष आहे. या वर्षी चिंतामणीच्या बाप्पाची आकर्षक आणि सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळत आहे. त्याचसोबतच देखावा देखील आकर्षक पध्दतीने तयार करण्यात आला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पाच्या दर्शनाला सुरवात झाली आहे. चिंतामणीच्या बाप्पाची विधिवत पूजा करुन बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच मुख दर्शनाच्या रांगेला सुरवात झाली आहे. चिंतामणीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणत आज गर्दी होण्याची शक्यता आहे.
कोकणातील गणेशोत्सवाला सुरुवात
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात गणरायाला आपल्या डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा आहे. भाताच्या हिगव्यागार शेतातून डोक्यावरून गणपती घरी आणले जातात. कोकणातल्या अनेक खेडेगावात ही परंपरा आजही गणेशोत्सवात कायम आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावातले हे विलोभनीय दृष्य गणेशभक्तांचं लक्ष वेधून घेत आहे. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झालं. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी कोकणात गणराय विराजमान होतात.
छत्रपती संभाजीनगरातही आजपासून गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. सकाळी नऊ वाजता ग्रामदैवत संस्थान गणपतीचे स्थापना होणार आहे. संस्थान गणपतीच्या स्थापनेसाठी दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, अतुल सावे, संदीपान भुमरे, कल्याण काळे, संजय शिरसाठ यांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी नऊ वाजता गणेशाची स्थापना होणार आहे. गोंदियात गणपती भक्तांची गणपती बाप्पा घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लगबग सुरु होती. गोंदिया शहरातील नेहरू चौकात गणेश मूर्ती घेण्यासाठी लहान मुलांसह लोकांनी गर्दी केली.