Mumbai Monsoon Update | मुंबईत पाऊस केव्हा बरसणार? आयएमडीने अखेर तारीखच सांगितली
Mumbai Rain Update | प्रत्येक मुंबईकराचं लक्ष हे केव्हा पाऊस येतोय आणि या उन्हापासून सुटका होतेय, याकडे लागंलय. या जीवघेण्या उकाड्यादरम्यान हवामान खात्याने मुंबईत केव्हा धो धो पाऊस बरसणार याबाबतची माहिती दिलीय.
मुंबई | गरम्याने हैराण झालेले मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जून महिना संपत आला मात्र पावसाची एन्ट्री अजून काही झालेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना दररोज सूर्यनारायणाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतोय. उन्हाच्या तडाख्यामुळे शरीराची लाहीलाही होतेय. तसेच पावसाळा लांबल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचीही टांगती तलवार आहे. या दरम्यान आयएमडीने मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. आयएमडीने मुंबईत पावसाची एन्ट्री केव्हा होणार हेच सांगितलंय. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
मुंबईत पावसाची एन्ट्री केव्हा?
हवामान विभागाने आज गुरुवार 22 जून रोजी पाऊस केव्हा होणार याबाबतची अपडेट दिली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनसुार, मुंबईत 23-25 जून दरम्यान मान्सूनची एन्ट्री होणार आहे. हवामान विभागाच्या अपडेटमुळे आता लवकरच मुंबईकराची उकाड्यापासून सुटका होणार आहे.
साधारणपणे मान्सूनची 25 जूनपर्यंत गुजरातमध्ये एन्ट्री झालेली असते. मात्र यावेळेस मान्सूनचा लेटमार्क लागला. मान्सूनला विलंबाचं कारण बिपरजॉय चक्रीवादळ सांगितलं जात आहे.
तर दुसऱ्या बाजूला काही हवामान तज्ज्ञांनुसार मुंबईकरांना आणखी काही दिवस मान्सूनची प्रतिक्षा करावी लागू शकते. मान्सूनची मुंबईत 25-26 जूनदरम्यान एन्ट्री होऊ शकते, असं या हवामान तज्ज्ञांचं मत आहे.
मान्सूनच्या लेटमार्कमुळे मुंबईत पावसाच्या कमतरतेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत 1-21 जून दरम्यान सांताक्रूझ वेधशाळेत जवळपास 327.2 मिमी पावसाची नोंद केली जाते. मात्र यंदा 17.9 मिमी इतकाच पाऊस झाला आहे. पाऊस कमी असल्याचा फटका हा तापमानावर झालाय. सध्याचं तापमान हे साधारण तापमानापेक्षा अधिक आहे. गुरुवारी मुंबईचं कमाल तापमान हे 34.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, जे सामन्य तापमानाच्या तुलनेत 3 डिग्रीने अधिक आहे.
दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात 22 ते 23 जूनपर्यंत चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. इतकंच नाही संपूर्ण राज्यामध्ये 25 जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. पावसाला विलंब झाल्याने अजूनही शेतीकामं झालेली नाहीत. राज्यात बऱ्याच ठिकाणी अद्याप हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहनही करण्यात आलंय. त्यामुळे आता या पावसाने आणखी अंत न पाहता सर्वसामांन्यांना आणि विशेष करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच अपेक्षा आहे.