सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. कांदिवलीत तर आज अवघ्या दहा मिनिटाच्या पावसाने संपूर्ण परिसरात पाणी तुंबले आहे. तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे आंबेनळी घाटात रात्री आणि पहाटे दोन वेळा दरड कोसळली आहे. त्यामुळे हा मार्गच प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, ठाण्यासह नऊ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसा अलर्टही जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना जपून राहावे लागणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यातील नऊ जिल्ह्यात मान्सून प्रचंड सक्रिय राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर आदी जिल्ह्यात येते काही दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे या भागातील अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच काही भागात झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने झाडांखाली न थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, रात्रभर रिपरिप सुरू असलेल्या पावसाने आता मुंबईतसह उपनगरात जोर धरला आहे. अवघ्या 10 मिनिटांच्या मुसळधार पावसामुळे कांदिवली जलमय झाली आहे. गेल्या 10 मिनिटांच्या मुसळधार पावसाने कांदिवलीतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पाण्याने भरलेले हे चित्र कोणत्याही नदीचे नसून कांदिवलीच्या लालजी पाड्यात असलेल्या इंदिरा नगर येथील आहे. या इंदिरानगरातून कांदिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हे पाणी भरले आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो लोक व शाळकरी मुले ये-जा करत असतात.
जेव्हा जेव्हा कांदिवलीच्या लालजीपाडा, इंदिरानगर परिसरात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा पावसाचे आणि गटारीचे पाणी या भागात साचते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप येतं. आताही अवघ्या दहा मिनिटाच्या पावसाने रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यावर साचलेल्या घाणेरड्या पाण्यातून लोकांना ये-जा करावी लागत आहे. नाल्याच्या आणि शौचालयाच्या या पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची भीती असल्याने नागरिक धस्तावले आहेत. महापालिका प्रत्येक पावसाळ्यात नालेसफाई झाल्याचा दावा करत असते. मात्र, लालजी पाड्यातील आजच्या परिस्थितीमुळे महापालिकेची पोलखोल झाली आहे.
मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर परिसरात अजूनही पाऊस सुरू आहे. कांदिवली आणि मालाड भागात मुसळधार पाऊस पडतानाच मध्येच काळेकुट्ट ढगही जमा होत आहेत. कांदिवलीप्रमाणेत इतर भागात पावसाचा जोर वाढल्यास अंधेरी, मालाड भुयारी मार्गासह सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
मीरा भाईंदर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच मीरा भाईंदर शहरात ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरला. मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर येथील सखल भागात पाणी साचाण्याची भीती निर्माण झाली आहे.